मुंबई - अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी मागितल्याप्रकरणी निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील बस्ती येथून एका सरकारी अधिकाऱ्याला अटक केली आहे. (Saurabh Tripathi Brother In Law Arrested) अटक केलेल्या अधिकार्याचे नाव आशुतोष मिश्रा असे आहे. जो निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचा मेहुणा आहे. आशुतोष मिश्रा हे उत्तर प्रदेश मधील बस्ती येथील (GST)मध्ये सहाय्यक आयुक्त आहेत. बस्ती सेलटॅक्स विभागाच्या मोबाईल टीममध्ये कार्यरत आहे.
पोलिसांची टीम वेगवेगळ्या राज्यात शोध घेत आहे - मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बुधवारे न्यायालयात हजर केले आणि तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड घेतला असून लवकरच त्याला मुंबईत आणणार आहे. याप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी आणि निलंबित डीसीपी त्रिपाठी यांच्या नोकराला आधीच अटक करण्यात आली आहे. निलंबित डीसीपी सौरभ त्रीपाठी त्यांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम वेगवेगळ्या राज्यात शोध घेत आहे.
अटकपूर्व जामीन अर्ज दाखल - मुंबई पोलिसांकडून शोधण्यासाठी 5 टीम तयार करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही सौरभ त्रिपाठी यांचा शोध लागलेला नाही आहे. सौरभ त्रिपाठी यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती वकीलांकडून देण्यात आली होती. मात्र, अद्याप त्यांनी कुठलाही अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला नाही.
कोण आहेत सौरभ त्रिपाठी? - डीसीपी सौरभ त्रिपाठी हे (2010)बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्रिपाठी यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. तिथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांनी बंदोबस्तासाठी चांगलं काम केलेले होते. त्यानंतर मुंबईत परिमंडळ (4)चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात डीसीपी म्हणून काम पाहिले आहे.
डीसीपी सौरभ त्रिपाठी फरार - त्यानंतर त्यांची नियुक्ती परिमंडळ 2 मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. जिथे त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली, पण त्यांनी अद्याप चार्ज घेतला नाही. दरम्यान त्रिपाठी यांना पहिले आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. गृहविभागाला निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर सही केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले सध्या निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी फरार असून त्यांचा शोध मुंबई पोलीस घेत आहे.
काय आहेत आरोप? - गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी अंगडिया असोसिएशनने मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी अंगडियांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी दरमहा (10)लाख रुपयाची लाच देण्याची मागणी केली होती. असे आरोप करण्यात आले होते. वरिष्ठ IPS अधिकारी म्हणतात, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या चौकशीनंतर सौरभ त्रिपाठी चर्चेत आले. कोपर्डी प्रकरणाचा तपास करून त्यांनी आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली होती.
हेही वाचा - अनिल देशमुख यांची सीबीआय विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव; आज सुनावणी