मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कंगनाने थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंविषयी वादग्रस्त विधान केले. नेहरूंसारख्या अशक्त मनाच्या व्यक्तीसाठी वल्लभभाई पटेलांनी पंतप्रधानपदासाठी तडजोड केली, असे कंगनाने ट्विटद्वारे म्हटले.
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेलांना कंगनाने अभिवादन करताना म्हटले की, अखंड भारतासाठी तुमचे मोठे योगदान आहे. पण आपण पंतप्रधानपदाचा त्याग केला. त्यामुळे महान नेतृत्व आणि दूरदृष्टीला आम्ही मुकलो. तुमचा हा निर्णय आम्हाला दुखावणारा ठरला, असे कंगनाने ट्विट केले. तसेच वल्लभभाई पटेल हेच खरे भारताचे लोहपुरूष आहेत. नेहरुंसारखा कमकुवत विचारसरणीचीच व्यक्ती गांधीजींना हवी होती. जेणेकरून व्यक्तीला पुढे ठेवून आपल्या नियंत्रणात देश चालवण्याचा विचार गांधीजींचा होता. ती एक चांगली योजना होती, पण गांधींच्या हत्येनंतर काय घडलं? असा सवाल तिने केला आहे.
गांधींचे मन राखण्यासाठी पटेल यांनी भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान नकारला. कारण त्यांना वाटत होते की, नेहरू चांगले इंग्रजी बोलतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या निर्णयाचा त्यांना त्रास झाला नाही, परंतु अनेक दशके राष्ट्राला त्रास सहन करावा लागला असल्याचंही तिने म्हटलं आहे.