मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडीना वेग आला असून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कालच भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे राज्यपालांना कळवले. तर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आज बोलावले आहे. शिवसेनेच्या आजच्या घडामोडी व पुढील रणनीती कशी असेल यावर रोजच्याप्रमाणे आजही शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यपाल महोदयांनी शिवसेनेला सत्ता स्थापने करता जास्त वेळ दिला असता, तर अधिक संख्याबळ जुळवता आले असते. असे मत व्यक्त केले.
राज्यपाल महोदयांनी भाजपला जो 72 तासाचा अवधी दिला होता. त्यात त्यांना खूप संख्याबळ जोडण्यासाठी बराच वेळ होता. मात्र, शिवसेनेला केवळ 24 तासाचा अवधी दिलेला आहे. त्यामुळे थोडा वेळ मिळाला असता, तर अजून चांगल्या प्रकारे संख्याबळ जुळवता आले असते अशी नाराजीही व्यक्त केली. यावरून राज्याला राष्ट्रपती राजवट कडे घेऊन जाण्याचाही प्रयत्न चालू असल्याची अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रहित सांगण्यासाठी आम्हाला भाजपने शिकवू नये कारण जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने मेहबूबा मुक्ती सोबत ही सत्ता स्थापन केली होती, ती काय लव्ह जिहाद होती का? असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील नेत्यांचा शिवसेनेशी राजकीय समीकरणा करता चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे महाराष्ट्र राज्य आमचे आहे. या राज्यात कुठलीही आस्थिरता येता कामा नये. राष्ट्रपती राजवटीच्या नावाखाली कोणीही सत्ता आपल्या ताब्यात ठेवू पाहत असेल तर त्याला तिन्ही ( शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस) पक्षाचा विरोध राहील. केंद्राच्या एनडीए सरकार मधून शिवसेना बाहेर पडेल का यावर बोलताना संजय राऊत म्हणाले आज केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे काही वेळात राजीनामा देत असून यातून आपण अर्थ समजून घ्यावे, असे अप्रत्यक्ष सांगितले.