मुंबई - आज खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडी तसेच विधानसभा अधिवेशनाच्या तयारीबाबत चर्चा केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच यावेळी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा झाली असून 'संघटना बळकट असेल, तर सरकार प्रदीर्घ काळ टिकेल आणि मुख्यमंत्री आमचाच राहील', असेही ते म्हणाले.
'सरकार कार्यकाळ पूर्ण करेल' -
यासंदर्भात पुढे बोलताना राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना एक कार्यकर्ता म्हणून भेटलो असल्याचे म्हटले. तसेच बाहेर चर्चा व्हावी, अशी काही विशेष चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सर्व स्थिर असून महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत. कुणी कितीही ढोल बडवले, तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - कोरोनाचे नियम पायदळी तुडवत भाजपाचे आंदोलन, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात
'महाविकास आघाडीला भविष्यात फायदा होईल' -
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उत्तम काम करत आहेत, लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत आहे. महाविकास आघाडीला भविष्यात त्याचा फायदा होईल', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मॅसेज होता, तो मुख्यमंत्र्यांना दिला. तसेच तिसऱ्या आघाडीत शिवसेना-काँग्रेस असावी, असे पवार यांचे मत आहे. आज आम्ही यूपीएत नाही आणि एनडीएतही नाही. राष्ट्रीय स्तरावर एक आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न विरोधीपक्षांचा दिसतो आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांना विरोधीपक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार यांची तशी भूमिका असून ती योग्य आहे. त्यात काही गैर नाही, असेही राऊत यांनी म्हणाले.
'...तर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणे सोपे' -
शरद पवार यांनी प्रशांत किशोरांना भेटावे की आणखी कोणाला भेटावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पवार देशातील महत्त्वाचे नेते आहेत. विरोधक सगळे एकत्र आल्यास लोकशाहीत विरोधीपक्षांची ताकद वाढेल आणि सरकारवर अंकूश ठेवणे सोपे जाईल, असेही राऊत यांनी म्हणाले.
'प्रताप सरनाईकांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा' -
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी फोनवरुन बोलणे झाले असून मी आजन्म शिवसेनेतच राहणार असल्याचे सरनाईकांनी स्पष्ट केले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच ईडीच्या कारवाईवर आमचे लक्ष असून प्रताप सरनाईकांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - राज्याची सूत्रे आमच्या हाती दिल्यास तीन महिन्यात ओबीसींना आरक्षण देऊ; अन्यथा राजकीय संन्यास घेईल - फडणवीस