मुंबई - कालपर्यंत राष्ट्रवादीच्या प्रचारात असणारे ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय पाटील यांनी सहकुटुंब शिवसेनेत प्रवेश केला. संजय पाटील गुरुवारी विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार धनंजय पिसाळ यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये दिसले होते. यानंतर अचानक त्यांनी मनगटावरचे घड्याळ काढत शिवबंधन बांधले.
शिवसेनेने भांडुप विधानसभेचे आमदार अशोक पाटील यांना डावलून विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांना तिकीट दिले. त्यानंतर नाराज पाटील यांनी मातोश्रीबाहेर धिंगाणा घातला. या पार्श्वभूमीवर रमेश कोरगावकर यांना भांडुपमधून दगाफटका होऊ नये, म्हणून माजी खासदार संजय पाटील यांचा आज पक्षप्रवेश करून घेण्यात आल्याच्या चर्चा आहेत. यावेळी उमेदवार रमेश कोरगावकर देखील उपस्थित होते.
हेही वाचा प्रदीप शर्मांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये कुणकुण !
पाटील गेल्याने धनंजय पिसाळ यांची ताकद वाढली
ईशान्य मुंबईत पाटील कुटुंब म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अशी ओळख होती. परंतु, गेल्या काही वर्षांत संजय पाटील यांचा करिष्मा कमी झाला होता. त्यांची पत्नी पल्लवी पाटील यांनी विक्रोळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती;पण हार पत्करावी लागली.
संजय पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ यांना विक्रोळी मतदारसंघात पाय रोवता येत नव्हता. आता पाटील शिवसेनेत गेल्याने पिसाळ यांचे वजन वाढल्याचे समजले जाते.