मुंबई- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आज अंमलबजावणी संचालनालय (ईडीने) छापे मारून सुरू केलेल्या कारवाईचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी स्वागत केले आहे. मागील दशकापासून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप निरुपम यांनी केला. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी त्यांनी मागणी केली.
प्रताप सरनाईक यांच्यावर आज ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम म्हणाले की, ईडीकडून करण्यात आलेली कारवाई ही एखाद्या राजकीय द्वेषापोटी केली जात असेल तर मी त्याची निंदा करतो. परंतु हेही तितकेच सत्य आहे की, मागील काही दशकांत शिवसेनेच्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. ज्यांच्यावर आज ईडीने छापेमारी करून चौकशी सुरू केली त्यांच्याबद्दल मला माहीत नाही. असे असले तरी मुंबई महापालिकेत यांची सत्ता असताना अनेक शिवसेनेच्या आमदारांसोबत अनेकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
संजय निरुपम यांची दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर टीका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत निरुपम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला बदनाम केले. काँग्रेसचे नेते भ्रष्टाचारी आहेत असे ते सांगत राहिले. परंतु त्यांनी आपल्या जवळ असलेल्या आमदार आणि महापालिकेतील भ्रष्टाचार पाहिला नाही. त्याकडे लक्ष दिले नाही. आज प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. परंतु ही चौकशी करत असताना कोणत्याही राजकीय द्वेषाने प्रेरीत ती नसावी. तसे असेल तर मी त्याची निंदा करतो, असेही ते म्हणाले.
हेही वाचा-प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचा छापा; शिवसेनेचे आणखी नेते रडारवर..
काय आहे ईडीच्या छाप्याचे प्रकरण-
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज पहाटेच ईडीचे छापे पडले. त्यांच्या ठाण्यातील घरांसह, मुंबईतील घरे आणि कार्यालयांवरही ईडीच्या पथकांचे छापे सुरू आहेत. आज पहाटे सहा वाजेपासूनच ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई योग्य असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे, तर ही कारवाई राजकीय आकसापोटी होत असल्याचे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचा निषेध नोंदवला आहे.
हेही वाचा-तीन दिवसांच्या सरकारची आज पुण्यतिथी; आमचं सरकार अजून चार वर्षं राहील - संजय राऊत
दरम्यान, राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत आहे.