मुंबई - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना काल मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्याने न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा - Gold Rates Today : सोने- चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ.. सोने २०० तर चांदी ३५० रुपयांनी वधारली
संजय छाब्रिया यांचे वकील यांनी मुदतवाढीला विरोध केला. छाब्रिया हे 10 दिवस ईडीच्या कोठडीत होते. तपासात सहकार्य केले आणि सर्व कागदपत्रे आणि उत्तरे दिली, असे न्यायालयासमोर म्हटले आहे. ईडीने सांगितले की, छाबरिया यांनी फ्लॅग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर 678 कोटी रुपये घेतले होते, जे सांताक्रूझ प्रकल्प, एव्हेन्यू 54 मध्ये सहभागी नव्हते. हे त्यांनी या प्रकल्पासाठी घेतलेल्या 2 हजार 100 कोटी रुपयांच्या कर्जाव्यतिरिक्त होते. ईडीने आरोप केला आहे की, संजय छाब्रिया यांनी घेतलेल्या पैशांमधील काही भाग त्यांच्या ग्रुप कंपन्यांनी त्यांच्या वन बीकेसी प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरला आहे.
काय आहे प्रकरण? - येस बँकेच्या 3 हजार 700 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. डीएचएफएल या फायनान्स कंपनीने येस बँकेकडून 3 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ही कंपनी नंतर दिवाळखोरीत दाखवून हे कर्ज बुडवण्यात आले होते. या कर्जाचा मोठी हिस्सा हा रेडियस ग्रुपला देण्यात आला होता. येस बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी हे कनेक्शन उघड झाले असून सीबीआयने ही कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वी संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपवर सीबीआयने छापेमारी केली होती. तेव्हापासूनच त्यांना अटक होणार अशी चर्चा होती.
संजय छाब्रिया यांनी बीकेसीमधील एक बिल्डिंग बांधली होती. त्यामध्ये अनेक राजकारण्यांचे कनेक्शन असल्याचा सीबीआयला संशय आला आहे. त्यामुळे, सीबीआयच्या या कारवाईमुळे आता अनेक राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत. आर्थिक अनियमितता आणि बेहिशेबी कर्जवाटप यामुळे रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर गेल्या वर्षी 5 मार्चपासून निर्बंध लागू केले होते. मात्र, त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केलेत. हा घोटाळा उघड झाल्यानंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर त्यांची पत्नी बिंदूसह दोन मुली रोशनी आणि राधा यांनाही अटक करण्यात आली होती. राणा कपूर बँकेचा सीईओ असताना सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले होते. यापैकी 20 हजार कोटी रुपयांची कर्ज बोगस असल्याचा दावा तपासयंत्रणेने केला आहे. त्याचबरोबर त्याने सुमारे 202.10 कोटी रुपयांची कर्ज काही दिवाळखोरी जाहीर केलेल्या कंपन्यांसाठी मंजूर केल्याचेही उघड झाले आहे.
हेही वाचा - Marathwada Eco Battalion : मराठवाडा इको बटालियनला पाच वर्षांची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांचा निर्णय