मुंबई - मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुंगात शिक्षा भोगतोय. अशातच या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने थेट एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एनसीबी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. यातच बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि त्यांचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हंसल मेहता यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा
यापूर्वी देखील हंसल मेहता यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर आरोप केले आहेत. यातच हंसल मेहता यांनी रविवारी समीर वानखेडेंविरोधात एका ट्वीट शेअर केले आहे. ज्यात यांनी लिहिले की, 'वानखेडे यांच्याविरोधातील गंभीर आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा'. ज्यांना अटक झाली आहे त्यांनाच निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी का द्यावी?
प्रभाकर साईलचे आरोप काय?
याप्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल हा के. पी. गोसावीचा बॉडीगार्ड आहे. यातील के. पी गोसावी तो आहे ज्याने आर्यन खानला एनसीबी कार्यालयात पकडून आणले. त्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता. तो सेल्फी सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला. मात्र, गोसावी या प्रकरणापासून फरार आहे. अशातच रविवारी आर्यन खान प्रकरणाचा साक्षीदार प्रभाकर साईलने एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. साईलने एक निवेदन सादर करत म्हटले की, के.पी. गोसावीच्या सांगण्यावरून तो यलो गेटवर पोहचला होता. यावेळी गोसावी समीर वानखेडेंना ८ कोटी द्यायचे आहेत असे बोलत असताना ऐकल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच, एनसीबीने माझ्याकडून १० कोऱ्या कागदपत्रांवर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेतल्याचेही त्याने म्हटले आहे.
एनसीबीचे डीडीजी मुथा अशोक जैन यांनी एक निवेदन सादर केले
समीर वानखेडेंवर साक्षीदार प्रभाकर साईलने आरोप केल्यानंतर एनसीबीचे डीडीजी मुथा अशोक जैन यांनी एक निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी म्हटले की, एनसीबीच्या एका गुन्ह्यातील साक्षीदार प्रभाकर साईलने निवेदन सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. तो साक्षीदार असल्याने आणि खटला न्यायप्रविष्ट असल्याने त्याने सोशल मीडियावर आपले म्हणणे मांडण्याऐवजी न्यायालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. परंतु समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
हेही वाचा - माझ्यावर छुप्या हेतूने कायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री करा, समीर वानखेडेंची पोलिसांना विनंती