मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात एटीएसकडून तपास केला जात आहे. या दरम्यानच्या काळात या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि स्काॉर्पिओचा मालक असलेल्या हिरेन मनसुख याचा मृतदेह मुंब्र्यातील रेती बंदर येथे आढळून आला होता. त्याचाही तपास एटीएसकडून करण्यात येत असून त्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांचा जबाब आज नोंदवण्यात आला आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्च अधिकारी सचिन वझे या अधिकाऱ्याकडून तपास केला जात होता. त्या दरम्यान हिरेन मनसुख यांचा संशयास्पद रित्या मृत्यू झाला. त्यानंतर सचिन वझे विरोधात विरोधी पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. यावर गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वझे यांची क्राइम ब्रांच मधून तूर्तास बदली करण्यात आल्याचे सभागृहात जाहीर केले. या सर्व घडामोडीनंतर या संपूर्ण प्रकरणात एटीएसने सचिन वझे यांची चौकशी केली. एटीएसने तब्बल 10 तास वझे यांची चौकशी करून जबाब घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सचिन वझेंनी आरोप फेटाळले
एटीएस चौकशीदरम्यान सचिन वझे यांनी कबूल केलेला आहे, की मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडी ज्यावेळेस सापडली होती, त्या घटनेपूर्वीपासून ठाण्यात राहणाऱ्या हिरेन मनसूख यास आपण ओळखत होतो. मात्र, त्याच्या मृत्यूशी आपला काहीही संबंध नाही, असे म्हणत सचिन वझें यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.