मुंबई - पोलीस खात्यातील क्राइम ब्रांच अधिकारी सचिन वाझे याला 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे निर्देश विशेष कोर्टाने दिले आहेत. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणी तपास सुरू आहे. याअंतर्गत सध्या वाझे एनआयएच्या कोठडीत आहे. वाझेला 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपल्याने त्यास कोर्टात सादर करण्यात आले होते.
स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके व धमकीचे पत्र ठेवल्याचे वाझेकडून कबूल
मुकेश अंबानी यांच्या घराच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटके व धमकीच्या पत्राच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास करत असताना मुंबई पोलीस खात्यातील क्राइम ब्रांच अधिकारी सचिन वाझे या अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर त्याची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान त्याने ही कबुली दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझे वापरत असलेल्या तीन आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
17 फेब्रुवारीला भेटले होते सचिन वाझे आणि मनसुख हिरेन
सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. वालचंद हिराचंद मार्ग जंक्शन येथे दोघांची भेट झाल्याचा दावा एनआयएने केला आहे. 17 फेब्रुवारीला रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी दोघांची भेट झाली होती. वाझे यांचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दरम्यान, वाझे यांनी अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याचा आरोप आहे. विनायक शिंदे, गौर आणि वाझे यांची समोरासमोर चौकशी करण्याची एनआयएची योजना आहे. एनआयएने कोर्टाकडे सचिन वाझेच्या 15 दिवसांच्या कोठडीची मागणी केली.
वाझेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद
आज झालेल्या सुनावणीवेळी वाझेंच्या वकिलांनी युक्तीवाद केला, की केवळ जिलेटिनच्या कांड्या विस्फोट करू शकत नाहीत, त्याच्यासोबत डेटोनेटर असेल तरच ते विस्फोटक मानले जाते. 'त्या' गाडीत किंवा वाझेंकडे असे कोणतेही डेटोनेटर सापडले नाही. त्यामुळे याला दहशतवादी कृत्य म्हणता येणार नाही.
आरोप खोडून काढण्याचा वाझेचा प्रयत्न
मला बळीचा बकरा बनवले जात असल्याचा दावा वाझेने कोर्टात केला आहे. मी दीड दिवस अँटिलिया स्फोटके प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. अचानक मला सांगितले, की तुझ्याविरोधात पुरावे आहेत, तुला अटक करतोय. जी काही चौकशी करायची होती ती करून झाली आहे. आता आणखी पोलीस कोठडी देऊ नका, अशी विनंती वाझेने कोर्टात केली होती. मात्र एनआयए कोर्टाकडे केलेली विनंती फेटाळण्यात आली आहे.
एनआयए ऑफिसमधून निघालेल्या गाडीत पुरावे?
अँटिलिया कार स्फोटके प्रकरणी एनआयए ऑफिसमधून एक गाडी एफएससीएलकडे रवाना झाली. या गाडीमध्ये बॉक्स भरलेले होते. बॉक्समध्ये मुद्देमाल (पुरावे) असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.