मुंबई- दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. त्यासाठीच खासदार मोहन डेलकर यांना भाजपकडून त्रास देण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारीला मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती.
खासदार मोहन डेलकर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सविस्तर माहिती दिली आहे. या पत्रात गेल्या अठरा महिन्यांपासून त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दादर- नगर हवेलीचे प्रशासन, प्रफुल खेडा पटेल आणि काही अधिकारी हे मृत्यूला जबाबदार असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये डेलकरांनी केला होता. डेलकर यांची आत्महत्या झाल्यानंतरही प्रफुल खेडा पटेल यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. पटेल यांच्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
संबंधित बातमी वाचा-खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूस 'या' लोकांना धरले जबाबदार; मुलाची पोलिसात तक्रार
हक्कभंग समितीचा अहवाल सादर करण्याची मागणी
वेळोवेळी होणाऱ्या त्रासाचा माहिती खासदार मोहन डेलकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिली होती. त्यावरच कोणतीच दखल घेतली गेली नसल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी यावेळी केला. तसेच लोकसभा हक्कभंग समिती समोरदेखील त्यांनी तक्रार केली. त्यानंतर डेलकर यांना दिलासा मिळाला नाही, असेही यावेळी सावंत म्हणाले. त्यामुळे हक्कभंग समितीने अहवाल सादर करण्याची मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
संबंधित बातमी वाचा- मनसुख हिरेन, खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ
आपल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपवर हे सर्व गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच खासदार मोहन डेलकर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्यावर होणाऱ्या त्रासासंदर्भात त्यांनी न्याय मागितला होता. मात्र, त्यांना भाजपकडून न्याय मिळाला नाही. मेल्यानंतर तरी आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेने त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार असलेल्या मुंबईत आत्महत्या केल्याचा दावा सावंत यांनी केला.
मोहन डेलकरांच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी-
मोहन डेलकर हे खासदार असताना त्यांना आत्महत्या करावी लागत आहे. तशा प्रकारची परिस्थिती तयार करण्यात आली. त्यामुळे डेलकर यांच्या कुटुंबियांच्या जीवालादेखील धोका असू शकतो. त्यामुळे कुटुंबियांना सुरक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली. तसेच गुजरातमध्ये काही लोकांचे संशयास्पद मृत्यू झाले आहे. अजूनही त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येऊ शकेल नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-खासदार डेलकर आत्महत्या प्रकरण : युट्युबवरील व्हिडिओ आणि 'सुसाईड नोट'मध्ये साम्य