मुंबई - देशातील आणि देशाबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या जन्मस्थानचा वाद मागील काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. या वादाला कुठेतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कारणीभूत असल्याचा सुरही काढला जातो. मात्र सोमवारी शिर्डीवासियांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि या वादावर पडदा पडला. त्यामुळे 'साईबाबांनी जन्म कुठे घेतला, यापेक्षा मनुष्यजातीला कल्याणाचा मार्ग दाखवला हे महत्वाचे' असे सांगत शिनसेनेच मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून जन्मस्थान वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हेही वाचा... साई जन्मभूमी वाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी
मराठवाड्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीच्या विकासासाठी 100 कोटी रूपये देण्याचे घोषीत केले. त्यावेळी त्यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थान असा केल्याचे सांगितले जात आहे. यावरूनच जन्मस्थान वादाची राळ उठली. त्यानंतर शिर्डी बंद, भाविकांचे हाल, चर्चा यांच्या अनेक फेऱ्यानंतर हा वाद वाढण्यापेक्षा तो थांबावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी शिर्डी ग्रामस्थांसोबत बैठक घेत, त्यांची समजूत काढली आणि या वादावर पडदा पडला. याबद्दल सामनातून संत साईबाबांच्या जन्मस्थानावरून जो वाद सुरू होता तो वाद साईबाबांच्या कृपेनेच थांबला असल्याचे म्हटले आहे. तसेच 'श्रद्धा आणि सबुरी' या बाबांच्या मंत्रावर आमची श्रद्धा आहे. त्यावर कोट्यवधी भाविकांनीही श्रद्धा ठेवावी, असे म्हटले आहे.
हेही वाचा... साई जन्मस्थान वाद: शिर्डी, पाथरी नाही तर 'या' ठिकाणी साईबाबा सर्वप्रथम दिसले