मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून ते सोशल मीडिया सोडतील, असे ट्विट केल्याबरोबर देशभरात तर्क-कुतर्कांना उधाण आले. मात्र, मंगळवारी पुन्हा दुसरे ट्विट करत आपले सोशल मीडिया अकाऊंट एका दिवसासाठी कर्तबगार महिलेला देऊ असे सांगत त्यांनी सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला होता. यावरून शिवसेनेने सामनामधून मोदींवर टीका केली आहे. तसेच, 'भाजपच्या सायबर फौजांचे काय होणार?' ही चिंताही मिटल्याचा उपहासात्मक टोला लगावला आहे.
पंतप्रधान मोदी हे सोशल मीडियाचा त्याग करीत आहेत काय? असा प्रश्न मोदींच्या पहिल्या ट्विटनंतर जरूर निर्माण झाला. मात्र, मोदींनी तो जाणीवपूर्वक घडवून आणला हे दुसऱ्या ट्विटनंतर सिद्ध झाले. मात्र, दरम्यानच्या काळात संपूर्ण देशाला सामावून घेणाऱ्या या नाटकाच्या अंकात 'अभिनयनिपुण मोदींच्या नाट्यछटेने' सर्वांना नेहमीप्रमाणे खिळवून ठेवले. इतके खिळवून ठेवले की, 'अफवांनी प्राण तळमळला', अशी मोदींच्या सोशल मीडिया फौजांची स्थिती झाली, असे शिवसेनेने म्हटले आहे.
काहीही झाले तरी, सोशल मीडियाचे व्यासपीठ हाच भाजपचा ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनची ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्य आहे. मात्र, काही काळ तसा भास निर्माण करण्याइतके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिनयनिपुण आहेत, अशी उपहासात्मक टीका शिवसेनेने केली आहे. आपण सोशल मीडिया सोडणार नाही हे आता मोदींनीच स्वयंस्पष्ट केल्यामुळे भाजपच्या सायबर फौजांचे काय होणार? हा प्रश्नही निकाली निघाला आहे. मात्र, काही तासांच्या अफवांनी या फौजांचा प्राण जरूर तळमळला असेल. मात्र, फौजेला आता नवे काम मिळाले आहे. ते बेरोजगार झाले नाहीत. उलट, आपले पंतप्रधान मोदी हे अभिनयनिपुण आहेत. त्यामुळे ते कधी कोणती नाट्यछटा सादर करतील याचा नेम नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
हेही वाचा - कोरोनाचे थैमान : भारताने रोखला इराण, इटली, जपान, दक्षिण कोरियाचा प्रवासी व्हिसा
हेही वाचा - अमेरिका-तालिबान शांतता कराराचा भारतावर काय परिणाम?
काय म्हटलंय अग्रलेखात ?
- आपले पंतप्रधान मोदी हे अभिनयनिपुण आहेत. त्यामुळे ते कधी कोणती नाटय़छटा सादर करतील याचा नेम नाही. मोदी यांनी लागोपाठ दोन दिवसांत केलेल्या दोन वेगवेगळय़ा ट्विटमुळे असेच नाटय़ निर्माण झाले. पण नंतर हा सस्पेन्स खुद्द मोदींनीच संपुष्टात आणला. मोदी यांनी सोमवारी अचानक जाहीर केले की, ‘‘सोच रहा हूं इस रविवार से सोशल मीडिया छोड दूं!’’ सोशल मीडिया म्हणजे समाजमाध्यमांचा त्याग करण्याच्या त्यांच्या घोषणेने मोदीभक्तांच्या छातीत कळा वगैरे आल्या. पण काही तासांच्या या वेदना मोदींच्या दुसऱया ट्विटनंतर कमी झाल्या.
- लोक राजकारणातून संन्यास घेतात, कामधंद्यातून बाजूला होतात, पडद्यावरून आणि रंगमंचावरून नट मंडळी तिसरी घंटा वाजवीत एक्झिट घेतात, पण आपले पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरूनच स्वतःला दूर करण्याचे सूतोवाच केल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. मात्र बुचकळय़ात टाकणाऱया या नाटकाचा ‘अंक दुसरा, प्रवेश दुसरा’ मंगळवारी समोर आला आणि या नाटय़ावर पडदा पडला. वास्तविक ‘सोशल मीडिया’ हा तर भारतीय जनता पक्षाचा पंचप्राणच! २०१४ चा लोकसभा रणसंग्राम भाजपने सोशल मीडियावर सायबर युद्ध करूनच जिंकला. गोबेल्स नीतीचा वापर त्या वेळी झाला व काँग्रेस राजकीय पटलावरून अदृश्य झाली.
- अमित शहा यांचे एक विधान त्या दृष्टीने महत्त्वाचे, ‘‘जेव्हा आमचे सायबर योद्धे मैदानात उतरतात तेव्हा विजय फक्त भाजपचाच होतो.’’ शहा यांचे हे विधान दखलपात्र आहे. पण भाजपच्या सायबर फौजेचे सेनापती नरेंद्र मोदी हेच मैदान सोडून निघून जात आहेत, असा संदेश पंतप्रधानांच्या कालच्या ट्विटमुळे गेला किंवा तो जाणीवपूर्वक तसा जाऊ दिला गेला. त्यावरून चर्चेचे घमासान सुरू झाल्यानंतरही लगेच खुलासा न करता चर्वितचर्वणाचा प्रयोग रंगू दिला गेला. नाटय़ पुरेसे रंगले आहे हे ध्यानात आल्यानंतर नवा क्लायमॅक्स पुढे करून धक्का देण्याचे तंत्र खुबीने वापरले गेले असेच आता म्हणावे लागेल.
- आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत कुशलतेने करण्यात मोदी पटाईत आहेत. साडेपाच कोटींपेक्षा जास्त लोक मोदी यांना ट्विटरवर ‘फॉलो’ करतात. मोदींचे फेसबुक पान पाच कोटी लोकांपर्यंत पोहोचते. इन्स्टाग्राम, यूटय़ूबच्या माध्यमातून मोदी रोज कोटय़वधी लोकांपर्यंत पोहोचतात. आता हे सर्वकाही सोडण्याचा निर्णय मोदी घेतीलच कसा? कारण सोशल मीडियाचा वापर म्हणजे नशापाणी नसले तरी त्याची एक धुंदी आणि अंमल असतोच. ती धुंदी इतक्या सहजासहजी सुटणे कठीणच.
- सोशल मीडिया सोडण्याच्या काही तासांच्या अफवेऐवजी मोदी यांनी टाटांचा मार्ग स्वीकारावा. पण तसे केले तर त्यांच्या सायबर योद्धय़ांचे काय होईल? फौजा तर शेवटी पोटावरच चालतात आणि आपण सोशल मीडिया सोडणार नाही हे आता मोदींनीच स्वयंस्पष्ट केल्यामुळे त्या फौजांचे काय होणार? हा प्रश्नही निकाली निघाला आहे. काही तासांच्या अफवांनी या फौजांचा प्राण जरूर तळमळला असेल, पण फौजेला आता नवे काम मिळाले आहे. काही तासांच्या अफवेचा एवढाच अर्थ आहे.