मुंबई - व्हॅलेंटाइन डेनिमित्त जर व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल माध्यमांवर तुम्हाला फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असल्याबाबतची लिंक येत असेल तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका. या अनोळखी लिंकद्वारे तुमची बँकिंगसंदर्भात असलेली गोपनीय माहिती व वैयक्तिक माहिती सायबर चोर गोळा करून तुमची आर्थिक फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
देशातील प्रसिद्ध ताज हॉटेलच्या संदर्भात एक लिंक सोशल माध्यमांवर सध्या व्हायरल होत असून व्हॅलेंटाइन डेनिमित्त ताज हॉटेलकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची मोफत व्यवस्था केली जात असल्याची अफवा सध्या पसरवली जात आहे. मात्र यासंदर्भात स्वतः ताज हॉटेलकडून ट्विटरच्या माध्यमातून खुलासा करण्यात आला आहे. ताज हॉटेल यांच्यामार्फत व्हॅलेंटाइन डेनिमित्त फ्री कुपन किंवा फ्री गिफ्ट कार्ड देण्यात येत असल्याची सोशल माध्यमांवर अफवा पसरली जात असून अशी कुठलीही योजना सध्या नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांचे आवाहन
यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की व्हॅलेंटाइन डेनिमित्त ऑनलाइन खरेदी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. फ्री कुपन किंवा फ्री गिफ्ट कार्डसंबंधित एखादी माहिती सोशल माध्यमांवर येत असेल तर अनोळखी व्यक्तीकडे येणाऱ्या लिंकवर क्लिक न करता त्याकडे दुर्लक्ष करावे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक केल्यास तुमची वैयक्तिक माहिती ही सायबर हल्लेखोरांपर्यंत जाऊ शकते, असेही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.