मुंबई - वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून गोव्यातील राज्य सरकारने गोव्यात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांना आता कोविड चाचणी करावी लागणार आहे.
कोरोना चाचणीसाठी धावपळ -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी अनेक राज्यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोव्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गोवा प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. त्यामुळे मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल काढण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. तर, गोवा प्रशासनाने गोव्यांच्या रहिवाशांना, गोव्यात कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना, वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गोव्याला जाणाऱ्यांना आवश्यकतेनुसार सूट देण्यात आली आहे.
प्रवास करताना आरटी-पीसीआर अहवाल सोबत असणे आवश्यक -
काही दिवसांपूर्वी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केले आहे. तर, आता गोवा प्रशासनानेही आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. रेल्वे मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या 72 तासांच्या आत घेतलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत घेऊनच प्रवास करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णांना सूट-
कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गोव्यात रहिवासी असलेल्यांना वास्तव्याचा पुराव्याच्या आधारे, गोवाला कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्राच्या आधारे आणि गोव्यात वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णाला वैद्यकीय पुराव्याच्या आधारे आवश्यकतेनुसार सूट देण्यात येणार आहेत.