नवी मुंबई : पनवेलमधील स्वामी समर्थांच्या मंदिरातील दानपेटीसह मंदिराच्या विश्वस्तांच्या घरी दरोडा (Robbery In Swami Samarth Temple in Panvel) टाकत देवीच्या वापरातील 5 तोळे दागिने लंपास करणाऱ्या दरोडेखोराला पनवेल पोलिसांनी अटक (Robbers in Temple arrested At Panvel Mumbai) केली आहे. गुरुनाथ तुकाराम वाघमारे असे 54 वर्षीय आरोपीचे नाव असून तो खैरासवाडी पेणचा राहणारा आहे. गुरुनाथवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. (Mumbai Crime)
मंदिर आणि घरात चोरी- 1ऑक्टोबरला रायगड जिल्हा पनवेलमधील आपटा फाट्यानजीक असलेल्या स्वामी समर्थ मंदिर तसेच साई हरिक्षेत्र परिसरात दरोडा पडला. या दरोड्यात दरोडेखोराने स्वामी समर्थ मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा तोडून स्टीलची दानपेटी लंपास केली. तसेच मंदीर परिसरातील संगमरवरी दानपेटी फोडत भक्तांनी दान केलेले पैसे लुटले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एवढ्यावर या दरोडेखोराची भूक भागली नाही म्हणून त्याने मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्या अंजली मुणगेकर यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडत आत प्रवेश केला. घरातल्या लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले अडीच लाख रुपये किमतीचे दागिने चोरत पोबारा केला. भाविकांच्या भावनेशी निगडीत असलेल्या या घटनेचा गांभीर्याने विचार करत नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस सहआयुक्त ऍक्शन मोडमध्ये आले. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 पनवेलचे शिवराज पाटील तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित सूत्रे हलली.
चिखलातील पावल्यांच्या चिन्हांवरून आरोपीचा सुगावा- DB पथकाचे API अविनाश पाळदे यांच्या टीमने सदर घटनेचा तपास सुरू केला. या टीमने सीसीटीव्ही फुटेज पाहिले, फुटेजमध्ये अंगात फक्त हाफ पॅन्ट घातलेला आरोपी चेहऱ्याला काळा कपडा बांधून दानपेटी घेऊन जाताना आढळला. गुन्ह्याची कार्यपद्धती, घटनास्थान, वेळ व इतर परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले असता, मंदिराच्या मागील भागात पोलिसांना चिखलात काही पावलांचे ठसे आढळले. यावरून आरोपी हा दरोड्यानंतर नदीकिनारी असलेल्या चिखलातून गेल्याचे निश्चित झाले. नदीकिनारच्या चिखलात आरोपीच्या डाव्या पायाचा ठसा स्पष्ट तर उजव्या पायाचा ठसा पुसट दिसत होता. त्यामुळे आरोपी पायाने लंगडत चालणारा असावा यावर पोलिसांचे ठाम मत झाले. पावलांच्या ठशांची दिशा लक्षात घेता पोलिसांनी पेण तालुक्यातील आदिवासी पाड्यांच्या दिशेने आरोपी गेल्याचा निष्कर्ष काढला.
अखेर चोर सापडला- त्यानंतर गुप्त बातमीदारांमार्फत पेण तालुक्यातील आदिवासी पाडे तसेच इतर परिसरात अशा वर्णनाचा व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा शोध घेतला असता खैरासवाडीत अशा वर्णनाचा एक जण रहात असल्याची माहिती मिळाली; परंतु तो सध्या पेण पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्हयात अटक असल्याचे समजले. पेण पोलीस ठाण्यात चौकशी केली असता संबंधित व्यक्ती दोन दिवसांपूर्वी कारागृहातून सुटल्याची माहिती मिळाली व तो एका पायाने लंगडत चालत असल्याचे पेण पोलिसांकडून कळाले. या वरून हा गुन्हा त्यानेच केला असल्याची खात्री पटली. पोलिसांनी गुरुनाथच्या रहात्या घराजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला. दरम्यान आरोपी गुरुनाथ वाघमारेने अशाच प्रकारेचे आणखी काही गुन्हे केले असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.