मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. या खड्ड्यांवरून पालिकेला नेहमीच टिकेला सामोरे जावे लागते. त्यानंतर या खड्ड्यांकडे दुलर्क्ष करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे लक्ष वेधण्याचे काम आरजे मलिष्काने केले आहे. या गाण्यामधून मलिष्काने पालिका प्रशासन आणि पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या कामाची पोलखोल केल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. खड्डे दाखवून दिल्यास ते त्वरित भरले जातील असे सत्ताधारी शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईच्या खड्ड्यांवर आरजे मलिष्काने 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का ?', 'गेली गेली मुंबई खड्ड्यात गेली' अशी गाणी बनवली आहेत. या गाण्यांच्या माध्यमातून मलिष्काने मुंबईमधील खड्ड्यांकडे पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेचे लक्ष वेधले होते. आता पुन्हा यावर्षी मलिष्काने खड्ड्यांवर गाणे बनवले असून या गाण्यांमधून थेट चंद्रच पृथ्वीवर आल्याचे म्हटले आहे. यावर मुंबई महापालिकेत पडसाद उमटले आहे. या गाण्याच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी पालिकेच्या कामाची पोलखोल केल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना मलिष्काने रस्त्यावरील खड्डे आरशांमधून दाखवले आहेत. आयुक्तांनी मलिष्काला आपतकालीन व्यवस्थापन विभाग आणि आपली कामे दाखवली. मात्र, त्याच मलिष्काने आज पालिकेला त्यांचा कारभार दाखवून दिला आहे. आपल्या गाण्यामधून मलिष्काने खड्डे दाखवून देत सत्तेत असलेल्या शिवसेनेची पोलखोल करण्याचे काम केले आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.
प्रशासकीय कामकाजावर आम्ही नगरसेवक नेहमीच बोलत असतो. नागरिकांच्या सूचना नगरसेवक मांडत असतात. त्या सूचनांवर काम करण्याच्या ऐवजी प्रशासनाने पालिकेची प्रयोगशाळा केली आहे. प्रशासनाने लोकांची कामे करणे अपेक्षित आहे. मात्र आज मलिष्काच्या गाण्यामुळे सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामी झाली आहे असे राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी म्हटले आहे.
खड्डे दाखवल्यास त्वरित बुजवले जातील -
खड्डे बुजवण्यासाठी प्रशासन आणि सत्ताधारी म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. खड्डे असतील तर ते ताबडतोब बुजवले गेले पाहिजेत. असे प्रशासनाला सांगितल्यावर प्रशासन बारकाईने लक्ष देत आहे. पोर्टल ट्विटर सारखी आम्ही अनेक माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. असे खड्डे दिसल्यास त्याची त्यांनी तक्रारी केल्यास ते खड्डे बुजवले जातात. खड्डे असल्याचे दाखवून दिल्यास ते त्वरित बुजवले जातील. मलिष्काला मुंबईची जाण आहे का ते माहीत नाही. प्रशासनाने मलिष्काला आपली कामे दाखवली होती. त्यावेळी मलिष्काने पालिकेच्या कामाची स्तुती केली होती. त्यामुळे त्यांचे नेमके मत काय हे समजण्या पलीकडचे आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.