मुंबई - सुशांत सिंह राजपूतने हत्या नव्हे आत्महत्या केली असल्याचे जरी एम्सच्या अहवालातून स्पष्ट झाले असले, तरीही या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होतच आहेत. सुशांत सिंह राजपूतचा मित्र सुधीर शुक्ला यांनी एक नवा खुलासा केला आहे. सुधीर यांच्या सांगण्यानुसार सुशांतच्या आत्महत्येपूर्वी काही दिवस आधीपासून रिया सेना नेत्यांच्या संपर्कात होती.
सुशांत आणि रिया सुट्ट्यांमध्ये अनेकदा लोणावळा येथील आपल्या व्हिलामध्ये येत होते. येथून जवळच पवना येथील एक जमीन रियाला खरेदी करायची होती. याबाबत माहिती काढली असता, जमिनीचा काही भाग वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे तिला समजले. त्यामुळे याबाबत ती शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना भेटली. दोघांमध्ये लोणावळा येथे भेट होऊन या जमिनीबाबत बोलणी देखील झाली होती. मात्र, नंतर लॉकडाऊन लागल्यामुळे ही बोलणी पुढे जाऊ शकली नाहीत, असा दावा शुक्ला यांनी केला आहे. याबाबत वन मंत्री संजय राठोड यांनी आपली बाजू अद्याप मांडलेली नाही. त्यामुळे भेटीबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे ते समजू शकलेले नाही. मात्र रिया प्रत्येकवेळी शिवसेनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे वारंवार सांगत आहे. तरीही त्यात फारसे तथ्य नसल्याचे शुक्ला यांचे म्हणणे आहे.
'हँग आउट व्हीला' आणि सुशांत…
सुशांत या लोणावळा येथील व्हीलामध्ये कधीकधी सुट्टीमध्ये हँग आउट करण्यासाठी येत असे. त्यामुळे तो या व्हीलाला 'हँग आउट व्हीला' म्हणत असे. ही व्हीला त्याने भाड्यावर घेतलेली होती. काही दिवसांपूर्वी एनसीबीच्या टीमने या फार्म हाऊस ला भेट देऊन येथे विचारपूस केली होती. त्यावेळी येथील केअर टेकर आणि बोटमन यांनी गेल्या काही वर्षात सुशांत याठिकाणी वेगवेगळ्या वेळी कधी रिया चक्रवर्ती तर कधी सारा अली खान तर कधी श्रद्धा कपूर हिच्यासोबत आल्याचे सांगितले आहे. एनसीबीने येथील काही कागदपत्रे देखील जप्त केली होती. मात्र सुशांत हा रिया, श्रद्धा किंवा सारा यांच्यासोबत पार्टी करताना ड्रग्ज घेत होता अथवा नाही याबाबत काही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.