मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती हिने सुशांतसिंहची बहीण प्रियांका सिंह व डॉ. तरुन कुमारविरोधात तक्रार अर्ज बांद्रा पोलिसांकडे दाखल केला आहे.
रिया चक्रवर्ती हिने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर तरुण कुमार यांच्या चिठ्ठीवरून सुशांतसिंहला एनडीपीएस अंतर्गत बंदी घालण्यात आलेली औषध देण्यात आली. डॉ तरुण कुमार यांच्याकडे सुशांत कुठल्याही प्रकारचे उपचार घेत नसतानाही औषधांची प्रिस्क्रिप्शन सुशांतला देण्यात आल्याचा आरोप रिया चक्रवर्ती हिने केला आहे. रियाने आरोप केलेला आहे की, डॉक्टर तरुण कुमार यांनी जी औषधं दिली आहेत, ती मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या टेलीमेडिसीन गाईडलाईननुसार योग्य नव्हती.
8 जून 2020 रोजी रिया चक्रवर्ती ही सुशांतसिंह याच्यासोबत होती. यावेळी सुशांतसिंह हा त्याच्या मोबाईल फोनवर सतत मेसेज करत होता. त्यावेळेस रिया चक्रवर्तीने तू कोणाला मेसेज करतो, असे विचारले असता त्याने त्याच्या मोबाईल फोनवर त्याच्या बहिणीने पाठवलेला मेसेज दाखवला. यामध्ये प्रियांका सिंह हिने सुशांत ला काही औषधांची यादी पाठवलेली होती आणि त्यात म्हटलं होतं की औषध सुशांतने घ्यावीत.
यादरम्यान, सुशांतला रियाने समजावून सांगितलं होतं की सध्या त्याच्यावर वेगळ्या डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्यांनी दिलेली औषधे सोडून इतर कुठलीही औषधे त्याने घेऊ नयेत. मात्र, असं सांगूनही सुशांतसिंह याने त्याची बहीण प्रियांका सिंह हिने सांगितलेली औषधे घेणार असल्याचं रियाला सांगितले होते. सुशांतसिंहची बहीण मीतु सिंह ही त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या घरी राहायला येत असल्याचे सांगितल्यानंतर रिया चक्रवर्ती त्याच्या घरातून निघून गेली होती.