मुंबई - राज्यातील दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा करिअरसाठी कोणत्या क्षेत्राकडे कल आहे, हे जाणून घेण्यासाठी घेतलेल्या कल चाचणीचा (अभिक्षमता चाचणीचा) निकाल जाहीर झाला आहे. यात तब्बल ८७ हजार २७४ विद्यार्थी कल चाचणीपासून दूर राहिल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात यंदा दहावीच्या परीक्षेला १७ लाख ८८३ हजार विद्यार्थी बसले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीतील विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी यंदा प्रथमच मोबाईलच्या माध्यमातून घेण्यात आली होती. राज्यातील २२ हजार १२२ शाळांमधून दहावीच्या १६ लाख १३ हजार ६०९ विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली होती. तर उर्वरित ८७ हजार २७४ विद्यार्थी यापासून दूर राहिल्याचे समोर आले आहे. जाहीर झालेल्या कल चाचणीच्या निकालात ३६ टक्के विद्यार्थ्यांनी सात कल क्षेत्रांपैकी ललित कला आणि गणवेशधारी सेवा या क्षेत्रांना प्राधान्य दिले आहे.
यामध्ये मुलींची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. तर २०.३३ टक्के मुलींचा कल ललित कला क्षेत्राकडे असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.तर १६.५७ टक्के मुलींचा कल गणवेशधारी सेवा या क्षेत्रात दिसत आहे. तर १८.९२ टक्के मुलांचा कल गणवेशधारी सेवा आणि १७.६३ टक्के वाणिज्य क्षेत्राकडे दर्शवित आहे. तर १७ टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य क्षेत्राला दुसरे प्राधान्य दिले आहे.३२ टक्के मुलींनी वाणिज्य आणि तांत्रिक या क्षेत्राला दुसरे प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे मुलींनीही वाणिज्य शाखेला दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य दिले आहे.
राज्यातील नऊ विभागांपैकी चार विभागांमध्ये गणवेशधारी सेवा आणि तीन विभागांमध्ये ललित कला हे कल क्षेत्राला सर्वात अधिक प्राध्यान्य दिले आहे. कृषी क्षेत्रात १४.७३ टक्के मुली आणि १३.५५ टक्के मुलांनी पसंती दिली असून मागील वर्षाच्या तुलनेत शेतीकडे कल असणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होत असल्याचेही दिसून आले आहे. या अहवालकल-अभिक्षमता चाचणीचा अहवाल १६ मार्च रोजीwww.mahacareermitra.inया पोर्टलवर दुपारी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर विद्यार्थ्यांना चाचणीचा छापील अहवाल २२ मार्चपर्यंत त्यांच्या शाळांवर उपलब्ध केला जाणार आहे.