मुंबई - गोरेगाव, सिध्दार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवासी शुक्रवारी म्हाडा कार्यालयावर धडकणार आहेत. मागील 13 वर्षपासून 672 रहिवासी बेघर असून 5 वर्षे झाली भाडे नाही. तर म्हाडाने तीन वर्षांपूर्वी प्रकल्प ताब्यात घेतला, पण काहीही न करता म्हाडानेही रहिवाशांना वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप करत रहिवाशांनी शुक्रवारी मोर्चा आणि धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.
13 वर्षांपूर्वी गुरुकुपा बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास हाती घेतला. घर पाडून पुनर्विकासाला सुरुवात केली. काही घरे बांधली. पण प्रकल्प काही पूर्ण केला नाही. त्यातच 2013 मध्ये या प्रकल्पात मोठा आर्थिक घोटाळा, 1 हजार कोटी पेक्षा अधिक घोटाळा झाल्याचे समोर आले. म्हाडाच्या चौकशीतून हा घोटाळा उघड झाला. तर दुसरीकडे गुरुकुपा बिल्डरने हा प्रकल्प परस्पर एका-दोघाला नव्हे तर चक्क 9 जणांना विकल्याचे ही समोर आले. त्यानंतर याची आणखी सखोल चौकशी करत बिल्डरकडून हा प्रकल्प काढून घेत म्हाडाने स्वतःच्या ताब्यात घेतला. हा प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेतल्यानंतर रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला.
आता पुनर्विकास मार्गी लागेल आणि हक्काचे घर मिळेल हे स्वप्न पुन्हा त्यांच्या डोळ्यात फुलले. पण 3 वर्षांत म्हाडाने ही काही केले नाही. रहिवासी बेघर ते बेघरच राहिले. त्यात गेली 5 वर्षे 672 रहिवाशांना भाडे मिळालेले नाही. ही लोकं स्वखर्चाने भाड्याने राहतात आहेत. पण आता मात्र या रहिवाशांचा संयम संपला आहे आणि त्यामुळेच त्यांनी आता आंदोलन छेडले आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता हे रहिवासी म्हाडा मुख्यालयावर धडकणार आहेत, अशी माहिती पत्राचाळ संघर्ष समितीचे मकरंद परब यांनी दिली आहे.
कॊरोना महामारीचा काळ आहे हे आम्हाला मान्य आहे. पण आम्ही 13 वर्षे महामारीमध्येच जगत आहोत. म्हणजेच आम्ही हक्काचे घर असताना खिशातून पैसे भरून भाड्याने राहत आहोत. तर आम्हाला हक्काचे घर कधी मिळणार याचे उत्तर नाही. तेव्हा आता आम्हाला आंदोलन हाच पर्याय वाटला. त्यानुसार आम्ही सर्व नियम पाळत शुक्रवारी आंदोलन करू असेही परब यांनी सांगितले आहे.