मुंबई- भेंडीबाजारात डोंगरीसारखी दुर्घटना घडू नये, त्यामुळे सैफी बुरहानी ट्रस्टने रहिवाशांसाठी बांधलेल्या इमारतीत स्थलांतर करावे. तसेच ज्यांना काही हरकती आहेत त्यांच्याशी चर्चा करु, असे म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी म्हटले आहे.
भेंडीबाजार येथील 16.5 एकर जागेवर सैफी बुऱहाणी अपलिफमेंट ट्रस्ट समूहाने त्या भागातील ट्रस्टच्या जागेत राहणाऱ्या रहिवाश्यांसाठी विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे तीन हजार लोकांना नवीन घरे मिळणार असून या प्रकल्पातील सुमारे 600 रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी ट्रस्टने भेंडीबाजारात 42 मजल्यांचा टॉवर बांधला आहे. यामध्ये रहिवाशांना 300 स्क्वेअर फुटांची घरे दिली जाणार आहेत.मात्र सुमारे 300 रहिवासी सहकार्य करीत नसल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. ट्रस्टने हे सर्व म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या निदर्शनास आणले.
डोंगरी इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रहिवाशांनी सहकार्य करून सुरक्षित घरांमध्ये स्थलांतर करावे, असे आवाहन घोसाळकर यांनी केले. जे रहिवासी घरे रिकामी करीत नाहीत त्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी आपण चर्चा करू असे त्यांनी ट्रस्ट आणि त्यांचा झालेल्या बैठकीत सांगितले. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती असल्या कारणाने घोसाळकर यांनी रहिवाशांसाठी ट्रस्टने बांधलेल्या इमारतीची पाहणी केली व बांधकामाबद्दल समाधान व्यक्त केले.
पाहणीवेळी भेंडीबाजार येथील पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांसाठी बांधलेल्या सदनिकांचा ताबा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जाईल, असे घोसाळकर यांनी ट्रस्टच्या म्हणण्यानुसार सांगितले.
म्हाडाच्या अखत्यारीत येत नसल्यामुळे म्हाडा या प्रकल्पातील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरे बांधू शकत नाही. त्यामुळे ट्रस्टनेच अशाच अजून काही इमारतीतील लोकांसाठी संक्रमण शिबिरे बांधावीत, अशा सूचना घोसाळकर यांनी केल्या आहेत.