मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. लोक मरत आहेत, मात्र पंतप्रधान ठोस निर्णय घेत नाहीयेत. कृषी कायदे रद्द केले तर काय बिघडणार आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकरी आपल्या बायका-पोरांसह थंडी वार्यात आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही. याउलट त्यांना कोण खलिस्तानी म्हणतंय, तर कोण पाकिस्तानी बोलतंय. हे चाललंय काय? असा संतप्त सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी आपल्यासाठी अन्नदाता आहे. देशात अन्नधान्याचा दुष्काळ होता, तेव्हा शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवून देश अन्नधान्याने संपन्न केला तसेच धान्य परदेशातही एक्स्पोर्ट केलं. त्या शेतकऱ्यांना तब्बल दोन महिन्यांपासून आंदोलन करावे लागते हे दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. कृषी कायदे रद्द करा, मागे घ्या, तो रिफिल करा, नवीन कायदा बनवायचा असेल तर नवीन बनवा आणि शेतकर्यांबरोबर चर्चा करा असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला आहे.