मुंबई - संजय गांधी यांची नियमानुसार काम करण्याची पद्धत, नियम हे सर्वांसाठी समान असतात. ही त्यांची वृत्ती यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना संजय गांधी हे नेते म्हणून आवडत होते. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर बाळासाहेबांनी मुंबई बंद केली होती. तसेच आज जर बाळासाहेब असते तर भाजपाची शिवसेनेला फसवण्याची हिंम्मतच झालीच नसती. अशा बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अनेक आठवणी जेष्ठ पत्रकार अजय वैद्य यांनी जागवल्या आहेत.
17 नोव्हेंबर 2012 ला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी शक्तीस्थळ निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी दरवर्षी शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतिदिनानिमित्त पत्रकार अजय वैद्य यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
संजय गांधींसाठी मुंबई बंद -
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चिरंजीव असलेले संजय गांधी यांनी नसबंदीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला होता. हा कार्यक्रम कोणताही धर्म न बघता राबवला पाहिजे, असे त्यांचे मत होते. दिल्ली येथील मुस्लिम वस्ती अनधिकृत असल्याने तोडण्यात आली. त्यावेळीही संजय गांधी यांनी झोपडपट्टी तोडल्याचे समर्थन केले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना संजय गांधी आवडत होते. संजय गांधी यांचे निधन झाल्यावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई बंद केली होती. याची माहिती आजही अनेक शिवसैनिकांना नाही, असे वैद्य म्हणाले.
...तर भाजपात हिंमतच नसती -
बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव स्पष्ट होता. त्यांनी कधीही समोर एक आणि मागून एक असे कधीही केले नाही. बाळासाहेबांचा दरारा होता. आज बाळासाहेब असते तर भाजपात शिवसेनेला फसवण्याची हिम्मत आलीच नसती. भाजपाने जो शब्द दिला होता तो त्यांना पाळावा लागला असता. राज्यातही शिवसेना-भाजपाचेचा सरकार सत्तेत आले असते. त्यावेळचे भाजपातील गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे या वैचारिक नेत्यांनीच शिवसेना आणि भाजपा युती टिकवून ठेवली होती, असेही वैद्य म्हणाले.
अजित वाडेकरांना 'त्या' प्रसंगापासून वाचवले -
भारतीय क्रिकेटमध्ये अमराठी कॅप्टन होत होते. अजित वाडेकर हे मराठी भाषिक कॅप्टन झाले. चांगली कामगिरी न करता वाडेकर यांची टीम भारतात माघारी येणार होती. त्यावेळी क्रिकेट मंडळातील इतर भाषिक लोक वाडेकर यांचे तोंड काळे करणार होते. याची माहिती मिळताच बाळासाहेब ठाकरे यांनी वाडेकर यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे जाहिर केले. जर वाडेकरांच्या केसालाही धक्का लावल्यास याद राखा!, असा इशारा दिला होतो. यामुळे वाडेकर यांचे तोंड काळे करण्याचा कार्यक्रम विरोधकांनी रद्द केला, असे वैद्य यांनी सांगितले.
हेही वाचा- बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतिदिन; मुख्यमंत्री सहकुटुंब वाहणार आदरांजली
हेही वाचा- बाळासाहेबांचा स्मृतिदिन : असाल तेथून अभिवादन करा, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन