मुंबई - राज्यातील कोरोनाची संख्या घटल्याने २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम निर्बंध कायम राहतील. तसेच लोकल सेवेचा निर्णय दोन दिवसांत घेण्यात येणार असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स समवेत आज झालेल्या बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे टोपे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने दिल्ली, कर्नाटकातील निर्बंध कमी केले. महाराष्ट्रात रुग्ण संख्या घटत आहे. राज्यात ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचे प्रमाण घटले आहे. त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक झाली. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णस्थितीचा आढावा घेण्यात आला. शनिवार-रविवार लॉकडाऊन, खासगी कार्यालयांच्या वेळा अशा विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.
२५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार -
ज्या २५ जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथे सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात परिपत्रक काढून ही शिथिलता दिली जाईल, असे टोपे यांनी सांगितले. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगर अशा एकूण अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. तेथे कोरोनाचे निर्बंध कायम राहणार असल्याचे टोपे म्हणाले.
..तर खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीची मुभा
ज्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. तेथे शनिवार-रविवार पूर्णपणे बंद ऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास समंती दिली जाईल. तर रविवारी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश असतील. तसेच, खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यास अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा देण्याबाबत निर्णय झाला आहे. दुकाने, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्याबाबत विचार सुरु असल्याचे आरोग्य मंत्री टोपे म्हणाले.
लोकलचा निर्णय दोन दिवसात
लोकल सेवा सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रेल्वे विभागाशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यानंतर एक दोन दिवसांत लोकल प्रवासाचा निर्णय घेतला जाईल, असे टोपे म्हणाले.
या जिल्ह्यात होणार निर्बंध शिथिल
मराठवाडा - परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद
विदर्भ - अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली
कोकण - रायगड, ठाणे, मुबई
उत्तर महाराष्ट्र - जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक
हेही वाचा - ही महाराष्ट्राची संस्कृती नाही! नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अजित पवारांचा टोला