मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. ही लाट थोपविण्याच्या उपाययोजना राज्य सरकारकडून केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वीक एंड लॉकडाऊनही लावण्यात आला. मात्र या लॉकडाऊनला विरोध होत आहे. राज्यातील कोरोनाच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबींचा हा आढावा...
व्यापाऱ्यांचा विरोध
राज्यातील या मिनी लॉकडाऊनला व्यापारी महासंघ विरोध करीत आहे. 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. काही वेळ दुकाने सुरू ठेवण्यास सवलत मिळावी, अशी मागणी साताऱ्यातील व्यापार्यांनी केली आहे. मुंबईतील व्यापारी संघटनानी एक पत्रक काढून लॉकडाऊन करू नये, असे आवाहन केले आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने नवीन निर्बंधांना तीव्र विरोध केलाय. आम्ही विकेंड लॉकडाऊनला सहकार्य करायला तयार होतो. मात्र आता अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमचे व्यवसाय बंद करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आमच्यावर सक्ती केल्यास आम्ही अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल सेवाही बंद करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही या लॉकडाऊनला विरोध केला आहे.
हेही वाचा - कोरोनाचा कहर : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आजपासून भाविकांसाठी बंद
खरेदीसाठी झुंबड
राज्यात नवे निर्बंध लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवशीही दादर मार्केटमध्ये तोबा गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. मंगळवारीही दादर मार्केटमध्ये गर्दी झाली. भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मार्केटमध्ये गर्दी केल्याचे चित्र दादरमध्ये बघायला मिळाले. मडमाडमध्ये वाइनशॉपवर मद्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. तर नाशिकमध्ये उद्योग धंदे, सार्वजनिक वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर 40 टक्के वर्दळ दिसून येत आहे.
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी बंदी
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकानुसार ३० एप्रिलपर्यंत सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी तर रात्री ८ ते सकाळी ७ आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत चौपाट्या, मैदाने, मंदिरे, मॉल, जिम, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, आदी तसेच सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा - लॉकडाऊनचा परिणाम; सावरलेल्या यंत्रमाग व्यवसायाची आर्थिक घडी पुन्हा विस्कटणार?
मंदिरे बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, शिर्डी, शेगाव यासह राज्यातील मंदिरांनाही नियमावली लागू करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाने शिर्डीच साईमंदीर काल रात्री आठनंतर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे साई मंदीर बंद होण्याची ही तिसरी वेळ आहे. शिर्डीतील सर्व व्यवहार हे साईमंदिर आणि शिर्डीत येणाऱ्या भाविकांनावर अवलंबून असल्याने शिर्डीत शुकशुकाट दिसून येत आहे. तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणारी सर्व मंदिरे कालपासून बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरदेखील कालपासून बंद करण्यात आले आहे.
राजकारणही जोरात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध नियम लागू करण्यात आले आहेत. राजकारण होतानाही दिसत आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने केवळ बिगर भाजपाशासित राज्यांचीच निवड का, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई मनपाला लोकसंख्येच्या तुलनेत 40 टक्के कमी लसी दिल्याचा आरोप भाजपा नेते गणेश नाईक यांनी केला आहे.