मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात डीएनबी शिक्षक ग्रेड १ आणि २ यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टरांना संधी देण्यात यावी. तसेच वरिष्ठ डॉक्टरांची वयोमर्यदा ६२ वरून ६५ करण्याचा घाट घातला जात आहे. या डॉक्टरांची वयोमर्यादा वाढवू नये, अशा मागण्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केल्या. यावर कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले.
..या पदांसाठी भरती -
मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला व वांद्रे येथील भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, कांदिवली येथील आंबेडकर हॉस्पिटल, एम एम एम सेन्टेनरी, राजावाडी आदी रुग्णालयात मेडिसीन, सर्जरी, पेडिएट्रिक, ऍनेस्थिया, रेडिओलॉजी, नाक कान घसा, पॅथॉलॉजी आदी पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी ग्रेड १ साठी २ लाख रुपये तर ग्रेड २ साठी दीड लाख रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. याबाबतची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा मांडला. यावर बोलताना पालिका बाहेरून येणाऱ्या डॉक्टरांना दीड ते दोन लाख रुपये मानधन देणार आहे. त्याचवेळी पालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना १ लाख २० हजार रुपये इतकाच पगार दिला जातो. जास्त पगार मिळतो म्हणून पालिका रुग्णालयातील डॉक्टर आपल्या नोकऱ्या सोडून या पदासाठी अर्ज करतील. अशाने पालिकेच्या केईएम, रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता भासणार आहे. डॉक्टरांची कमतरता भासू नये म्हणून कोरोना काळात ज्या डॉक्टरांनी रुग्णांची चांगली सेवा केली आहे अशा डॉक्टरांना या पदावर सामावून घ्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली.
डॉक्टरांच्या निवृत्ती वय ५८ वर्ष इतके होते. त्यात बदल करून ते ६० आणि नंतर ६२ वर्ष करण्यात आले. आता काही डॉक्टर हे वय ६५ वर्ष करण्याचा घाट घालत आहेत. त्यासाठी बैठक घेतल्या जात आहेत. अशी माहिती मला मिळाली आहे. काही मोजके डॉक्टर एकाच पदावर राहणार असतील तर इतर कनिष्ठ डॉक्टरांना वरिष्ठ डॉक्टर बनण्याची संधी मिळणार नाही. हा त्या कनिष्ठ डॉक्टरांवर अन्याय आहे. यासाठी पालिकेने डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे आहे त्यात बदल करू नये अशी मागणी विशाखा राऊत यांनी केली. कोरोना काळात ५० वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांना धोका असल्याने घरी राहण्याचा सल्ला दिला जातो. मग ज्या डॉक्टरांचे वय झाले आहे, त्यांना वरिष्ठ पदावर नियुक्त करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.