मुंबई - दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सूचनेनुसार कुलाबा येथील ताज हॉटेल, नरीमन पॉइंट परिसरातील ट्रायडंट हॉटेल तसेच फोर्ट येथील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या बाहेरील रस्ते आणि पदपथ सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी बंद केले होते. यापैकी मुंबई महापालिकेने 'ताज' हॉटेलला रस्त्यांवर बॅरिकेटिंग करून रस्ते अडवल्याप्रकरणी सूट दिली आहे. मात्र ट्रायडंट हॉटेल तसेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला शुल्क भरण्याच्या नोटिसा बजावल्याने पालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. या प्रकरणी प्रशासन दुटप्पी वागत असल्याची टीका विरोधी पक्षाने केली आहे.
दहशातवादी हल्ले, बॉम्बस्फोट -
१९९२ साली बाबरी मशीद पाडल्यावर मुंबई १९९३ साली बॉम्बस्फोट झाले होते. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या बाहेरही बॉम्बस्फोट झाला होता. पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाबने २६/११ ला मुंबईवर हल्ला केला होता. त्यानंतर कुलाबा येथील ताज हॉटेल, नरीमन पॉइंट परिसरातील ट्रायडंट हॉटेल तसेच फोर्ट येथील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या बाहेरील रस्ते आणि पदपथ सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी बंद केले आहेत. हे रस्ते सुरक्षेच्या कारणावरून अडवले असल्याने त्याचे शुल्क संबंधितांना भरावे लागते.
रस्ते वापराबाबत शुल्क - रस्ते वापरल्याबाबत पालिकेने हॉटेल ताजला ८ कोटी ५० लाख रुपये भरण्यास सांगितले होते. ताजने ६६ लाखांचा भरणा केला आहे. इतर शुल्क ऐतिहासिक ठेवा आणि सुरक्षेचे कारण देत पालिकेने माफ केले आहे. त्याचवेळी पालिकेने हॉटेल ट्रायडंट आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला शुल्क भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला दरमहा भाड्यापोटी २ लाख १२ हजार याप्रमाणे ४ कोटी रुपये शुल्क, तसेच १५ टक्के व्याजापोटी ६० लाखांहून अधिक रक्कम भरण्यास सांगण्यात आली होती. नंतर हिशेबात गोंधळ झाल्याचे स्पष्ट करून, २ कोटी रुपये शुल्क भरण्यास सांगण्यात आले आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने या प्रकरणी पालिकेला पत्र पाठवून सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील पार्किंग व मोकळी जागा पोलिसांनी बंद केली आहे, असे पालिकेला कळविले आहे. सार्वजनिक हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दंड भरण्यास बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने नकार दिला आहे.
वेगवेगळा न्याय -
ताजला वेगळा न्याय आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला वेगळा न्याय असे का? असा सवाल करत विरोधी पक्षाने पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. पालिकेचा उपायुक्त ताजच्या चेंबरचा सदस्य आहे. ताज हॉटेलमध्ये पालिका अधिकारी जात असल्याने सूट दिली जाते. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज पालिका अधिकाऱ्यांना काही देत नाही त्यामुळे त्यांना सूट दिली जात नाही. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. तर शिवसेनेने याला उत्तर देताना जर सुरक्षा यंत्रणांनी योग्य कारण कळवले असेल तर शुल्क आकारायचे किंवा आकारू नये संबंधित मागणीवर आम्हाला विचार करता येऊ शकतो. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी जे उपाय करता येतील ते आम्ही करू असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.