मुंबई - केंद्र सरकारच्या तीन कृषी सुधार कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने आज (सोमवारी) भारत बंदची हाक दिली. या बंदला देशातील काही राजकीय पक्षांनी समर्थन दिले आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज (सोमवारी) रास्ता रोको केला. मुंबईच्या विक्रोळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर बिंदुमाधव चौकात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पाच ते दहा मिनिटे हा रास्ता रोको करण्यात आला. काही वेळातच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर अंधेरीमध्ये पाच राजकीय पक्षाने एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
'कायदे मागे घ्या'
केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी काळा कायद्याचा आम्ही विरोध करत आहोत. हे कायदे लवकरात लवकर मागे घेतले पाहिजे. आमचा पक्ष हा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. हा कायदा लवकरात लवकर मागे घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अब्दुल अन्सारी यांनी दिली आहे.
काँग्रेसचेही निदर्शने
मुंबई काँग्रेस तर्फेही विविध ठिकाणी जोरदार आंदोलने करण्यात आले. विक्रोळीत निदर्शने करत दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय कृषी सुधार कायदे लवकरात लवकर मागे घ्यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीविरोधात अंधेरीत पाच राजकीय पक्षांनी एकत्र येत केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
हेही वाचा - शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद; जाणून घ्या 'त्या' तिन्ही कृषी कायद्यांविषयी