मुंबई - मुंबईत सध्या लहान मुलांच्या अंगावर आणि तोंडात पुरळ येण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागले आहेत. मात्र, ही मंकीपॉक्सची लक्षणे नव्हे, तर हँडफ्रूटची लक्षणे ( Rashes in Children Hand Fruit Not Monkeypox Virus ) असल्याची माहिती जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे ( J J Hospital Dean Pallavi Saple ) यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. कोरोनाची चौथी लाट ओसरत असली तरी, बूस्टर डोस नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करताना रुग्णव्यवस्थेवरील ताण कमी करण्याबाबतही सापळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबईतील भायखळा येथील जे जे शासकीय रुग्णालय हे सर्व प्रकारच्या रोगांसाठी आणि रुग्णांसाठी वरदान ठरते आहे. या ठिकाणी होणारी उपचार पद्धती पाहता केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातूनच नाही तर परराज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल होत असतात. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांचा प्रचंड लोंढा सतत असतो. या रुग्णांना विविध योजनांच्या माध्यमातून औषधोपचार केले जातात. त्यामुळे जे जे रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज सुमारे अडीच ते तीन हजार रुग्णांची तपासणी केली जाते, अशी माहिती जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.
'अति महत्त्वाच्या व्यक्तींचा राबता' - जे जे रुग्णालय हे एकमेव शासकीय रुग्णालय मुंबईत आहे. या रुग्णालयाच्या अंतर्गत सेंड जॉर्ज, कामा आणि जी टी रुग्णालय येतात. महिलांसाठी आणि बालकांसाठी कामा रुग्णालय हे विशेष रुग्णालय म्हणून काम पाहते. सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी असल्याने या रुग्णालयावर आणि प्रशासकीय सेवेवर नेहमी ताणे आलेला असतो. त्यातच जे जे रुग्णालय मध्यवर्ती असल्याने अति महत्त्वाच्या व्यक्ती ज्यामध्ये मंत्री, आमदार, खासदार, न्यायाधीश तसेच परराज्यातून अथवा परराष्ट्रातून येणारे महत्त्वाचे अतिथी यांना रुग्णसेवा या रुग्णालयामार्फत दिली जाते. त्यासाठी या रुग्णालयाने एक विशेष कक्ष उभारला असून, त्या माध्यमातून अशा अति महत्त्वाच्या व्यक्तींची रुग्णसेवा वेळेत आणि चोख दिली जाते, अशी माहिती डॉ सापळे यांनी दिली आहे.
'न्यायालयापुढे हजर करण्याआधी तपासणी' - एखाद्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला न्यायालयापुढे हजर करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. अशा सर्व संशयित आरोपींची तपासणी जे जे रुग्णालयात केली जाते. त्याचा अधिक ताण रुग्णालयावर येतो. विशेष म्हणजे या रुग्णालयात अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यासारख्या राजकीय व्यक्तींची ही तपासणी केली जात असल्याने अशा वेळेस पोलीस छावणीचं रूपच रुग्णालयाला येते. यापूर्वी या रुग्णालयात सुरेश जैन, छगन भुजबळ, साध्वी प्रज्ञा सिंग, अश्विन नाईक अशा कैदेत असलेल्या व्यक्तींना दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोणाला तपासणीसाठी आणणार आहे हे आम्हाला अलीकडे माध्यमातून आधी कळते, असे डॉ. सापळे मिश्किलपणे सांगतात.
'मुंबईत मंकीपॉक्स नाही' - मुंबईमध्ये अद्यापपर्यंत मंकीमंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. लहान मुलांमध्ये काही प्रमाणात अंगावर अथवा तोंडात पुरळ येण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, त्या हँन्डफ्रुटच्या घटना आहेत. पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. तीन ते चार दिवसात हा आजार बरा होतो, असेही डॉक्टर सापळे यांनी स्पष्ट केले. मुंबईत सध्या साथीचे आजार पसरत असले तरी त्याला तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. कोरोनाची चौथी लाट ओसरत असली तरी, नागरिकांना बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही डॉ. सापळे यांनी यावेळी केलं आहे.
हेही वाचा - Sunil Raut : 'संपूर्ण कुटुंबाला ईडीने अटक केली, तरी घाबरणार नाही; शिवसेना सोडणार नाही'