मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या घडमोडी सतत नवीन वळण घेत असून, आज पार पडलेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या आमदारांना बाऊंसरच्या साहाय्याने डांबून ठेवले असल्याचा आरोप केला. तसेच भाजपचे आमदार मतदारसंघात शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेत असताना विरोधकांचे लोकप्रतिनिधी हॉटेलमध्ये राहून बेछूट आरोप करत आहेत, असे ते म्हणाले.
भाजप पुरस्कृत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातील काही प्रकरणांमध्ये दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली होता. यावर बोलताना, सिंचन घोटाळ्याचा विषय न्यायालयाच्या अखत्यारित असून त्याच्याशी सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे दानवे यांनी सांगितले. तसेच अजित पवारांकडे व्हीपचा अधिकार असून तेच गटनेते असल्याचा पुनरूच्चार दानवे यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी सेनेच्या संजय राऊत यांच्यावरही कडव्या शब्दात टीका केली. संजय राऊत यांना वेड लागले असून, त्यांना वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
आघाडीचे वकिल कपिल सिब्बल यांनी राम काल्पनिक असल्याची टीका केली होती. आणि आता हिंदुत्वावर बोलणारी शिवसेना त्यांचीच मदत घेत असल्याचा आरोप दानवेंनी केला. यावेळी बोलताना, 2014 मधील मे महिन्यात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील संदर्भ त्यांनी दिला. सिब्बल हा दारू पिऊन उच्छाद करणारा माकड असल्याचा उल्लेख संजय राऊत यांनी सामनामध्ये केला होता, असे दानवे म्हणाले.
राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात घडणाऱ्या घटनांवर बोलताना, काँग्रेसने अद्याप गटनेता निवडला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीच्या गटनेत्याचा भाजपलाच पाठींबा असून, शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देखील घोषित करण्यात न आल्याने राज्यपालांनी फडणवीस यांना शपथ दिल्याचे दानवे म्हणाले. राज्यातील शेतकरी अडचणीत आल्यानंतर आम्ही सरकार स्थापनेचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात राज्यपाल आणि राष्ट्रपती हे दोघेही कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतील, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.