मुंबई - कुख्यात गुंड सुरेश पुजारी विरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांताक्रूझ येथील हॉटेल व्यावसायिकाकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ओशिवरा येथील रहिवासी असलेल्या 51 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. सुरेश पुजारीला मागील महिन्यात फिलिपिन्समध्ये अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर पहिला गुन्हा मुंबईत दाखल झाला आहे.
हेही वाचा - जाणून घ्या, मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय, लक्ष्मीपुजनादिवशी एक तास सुरू राहणार ट्रेडिंग
काय आहे तक्रार?
मार्च महिन्यात कुख्यात गुंड सुरेश पुजारीकडून खंडणीच्या धमक्या आल्या होत्या. 50 लाख रुपये न दिल्यास रेस्टॉरेंट मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून प्रकरण गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुरेश पुजारीच्या अटकेच्या बातम्या पाहिल्यानंतर तक्रारदार हॉटेल व्यावसायिकाने याप्रकरणी पुढे येऊन सुरेश पुजारीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आलेली आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी कलम ३८७, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश पुजारी कोण आहे?
पुजारी फिलिपिन्समध्ये २० सप्टेंबरपासून वास्तव्याला होता. भारतीय तपास यंत्रणा आता सुरेश पुजारीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. पूर्वी सुरेश पुजारी गँगस्टर रवी पुजारीसोबत मिळून काम करत होता. त्यानंतर सुरेश पुजारीने रवी पुजारीपासून दूर होत, स्वतःची टोळी बनवली. २०१८ मध्ये मुंबई व ठाण्यातील सुमारे २५ व्यावसायिकांना खंडणीसाठी सुरेश पुजारी टोळीच्यावतीने धमकावण्यात आले होते. पुजारी २००७ मध्ये पुजारी देश सोडून पळाला होता. तेव्हापासून तो परदेशातून व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावत होता. १० जानेवारी २०१८ मध्ये भिवंडीतील एका हॉटेलमध्ये खंडणीच्या वादातून गोळीबार झाला होता. गोळीबारात तेथील स्वागत कक्षातील महिला कर्मचारी जखमी झाला होता. या गोळीबारानंतर खंडणीच्या यादीत असलेल्या मुंबई व ठाण्यातील सर्व व्यावसायिकांना पुजारीने पुन्हा दूरध्वनी करून यावेळी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत आधी मागितलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रकमेची मागणी केली होती. तो 14 वर्षांपासून फरार होता. 2015 मध्ये इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुजारी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि नंतर रवी पुजारी टोळीशी निगडीत होता.
हेही वाचा - शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या बेनामी 27 कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरू