मुंबई - भाजपाच्या मुलुंड येथील नगरसेविका रजनी केणी यांच्या मुलांसह तिघांवर नवघर पोलीस ठाण्यात खंडणी आणि अपहरण ( Mulund Ransom and Kidnapping Case ) इत्यादी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता नवघर पोलीस ठाण्यावर आरोप होऊ लागले आहेत. यातील तीन आरोपींपैकी मनोज जाधवला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी निमितला मात्र पोलिसांनी सूट दिली आहे. याचाच फायदा घेऊन आता नमित फरार झाला आहे.
पालिकेच्या एका कंत्राटदराने हा गुन्हा दाखल केला आहे. केणी यांच्या विभागात असलेले एक काम ऑनलाइन टेंडरमध्ये त्या कंत्राटदारला लागले होते. मात्र, हे टेंडर त्याने मागे घ्यावे म्हणून केणी यांचा मुलगा नमित केणीने त्या कंत्राटदार कार्यालयत बोलावून धमकावले आणि टेंडर मागे घेण्यास सांगितले. त्या कॉन्ट्रॅक्टरला मनोज जाधव आणि गोविंद जाधव यांच्या मदतीने बळजबरीने पालिका टी विभागात नेण्यात आले आणि तिथे कंत्राटमागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप या कंत्राटदारने त्याच्या तक्रारीत केला आहे.
गुन्हा दाखल झाला तेव्हा नमितची हळद होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न तर तिसऱ्या दिवशी सत्य नारायणची पूजा होती. सर्व कार्यक्रमांना भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि नेते देखील उपस्थित होते. मात्र, तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली नाही. आता नमितशी पोलिसांचा संपर्कच होत नाहीये. यामुळे पोलिसांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकारीनी या बाबत नवघर पोलिसांवर आरोप केला असून आता किरीट सोमय्या गप्प का, असा सवाल केला आहे. यासंदर्भात पोलीस मात्र काहीही बोलण्यास तयार नाहीत.