मुंबई- शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र राहावी, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न होते. याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा. ज्यांच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री झालेत, हे बाळासाहेबांनाही आवडले नसते, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले. चैत्यभूमी येथे दर्शन घेतल्यानंतर आठवले माध्यमांशी बोलत होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज चैत्यभूमी येथे दर्शन घेतले. राज्य सरकारने सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय उशिरा घेतला असला तरी या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
प्रार्थनास्थळ उघडल्याने सरकारचे आभार
मार्चपासून लागू झालेल्या टाळेबंदीमुळे चैत्यभूमी येथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता आले नव्हते. आता अनलॉक करण्यात आले आहे. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली असल्याने रामदास आठवले यांनी आज चैत्यभूमी येथे जाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. प्रार्थनास्थळ उघडण्याच्या निर्णयाचे आठवले यांनी स्वागत केले.
शिवशक्ती भीमशक्ती एकत्र राहावी हे बाळासाहेबांचे स्वप्न
२०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र आले होते. त्यानंतर सत्तांतर झाले होते. आता परिस्थिती बदलली आहे. नितीशकुमार यांना शब्द दिल्याने त्यांना मुख्यमंत्री केले. तसा शब्द राज्यात भाजपने शिवसेनेला दिला नव्हता. दरम्यान, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळू शकले नसल्याने भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे.
घरीच प्रतिमेचे पूजन करण्याचे आवाहन-
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर कुणी येवू नये, गर्दी करू नये, असे त्यांनी आवाहन केले. कोरोनामुळं सर्वांनी घरीच बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करावे, असेही त्यांनी आवाहन केले.