मुंबई - राज्यात सध्या भोंग्यावरून मोठं राजकारण चालू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे आव्हान सरकारला केलं आहे. तर दुसरीकडे हे भोंगे ( Loudspeaker On Mosque ) उतरवू नयेत, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी सांगितलं ( Ramdas Athawale Supports Mosque Loudspeakers ) आहे. मुंबई ते बोलत होते.
मशिदीवरील भोंगे उतरवू नयेत! : ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा असा जाहीर इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. नाहीतर सर्वत्र हनुमान चालीसा लावली जाईल, असेही ते म्हणाले आहेत. यावरून आता आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी भोंगे उतरवले जाऊ नयेत, असं विधान केलं आहे. वास्तविक राज ठाकरे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी कधी भोंगे उतरावे, असे सांगितले नाही. परंतु राज ठाकरे जे सांगत आहेत ते चुकीचे आहे. भाजप बरोबर मनसे कधी येऊ शकत नाही. किंबहुना भाजप मनसेला कधी बरोबर घेऊ शकत नाही, असे विधानही त्यांनी केले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी रामदास आठवले आले होते. त्याप्रसंगी बोलताना त्यांनी एकीकडे राज ठाकरे यांच्या भोंग्याबाबत भूमिकेचा विरोध केला तर दुसरीकडे मशिदीवरील भोंगे उतरवले जाऊ नयेत, असे सांगत भाजपच्या भूमिकेलाही विरोध केला आहे.
आठवलेंच भोंग्याला समर्थन! : राज ठाकरे यांच्या मनसेशी भाजपची जवळीक वाढत असताना दुसरीकडे भाजपसोबत असलेल्या आरपीआयने राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध केल्याने आता नवीन पेच निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता मशिदीवरील भोंगे काढण्यात यावेत याबाबत भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देऊन याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली होती. परंतु आता आरपीआयने भोंग्याला समर्थन दिल्याने भाजप याबाबत काय भूमिका घेते हे बघावं लागणार आहे.