मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवले (Shivsena symbol) व नावही वापरण्यास बंदी घातली आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. यावर बोलताना, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच पक्षावर ही वेळ आली असल्याची टीका भाजप प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे.
काय म्हणालेत राम कदम? : याप्रसंगी बोलताना राम कदम म्हणाले की "बारामती मध्ये फटाके फोडून दिवाळी साजरी केली जाते आहे. बारामतीकरांच अनेक दिवसांच स्वप्न पूर्ण झालं, म्हणून दिवाळी साजरी केली जाते. नेमकं खरे कारण काय आहे? यालाच म्हणतात पाठीत खंजीर खुपसणे. श्रीमान उद्धवजींच्या भाषेत सांगायचं झालं तर गद्दारी. स्वर्गीय बाळासाहब ठाकरे यांचं अजरामर वाक्य आहे. ते म्हणाले होते, त्यांचा पक्ष कधीही काँग्रेस व तशी विचारधारा असलेल्या लोकांसोबत जाणार नाही. जायची वेळ आली तर पक्ष बंद करीन पण हिंदुत्व सोडणार नाही. जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्मरणात ठेवले असते, हिंदुत्व सोडलं नसत, आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवला असता, घरात बसून राहण्यापेक्षा घराबाहेर पडून गोर गरीबांची सेवा केली असती, तर कदाचित आज बारामती मध्ये जी दिवाळी साजरी केली जात आहे, तिची इतिहासाच्या पानात नोंद राहिली नसती", असे राम कदम म्हणाले.