मुंबई - दहा जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election 2022) आधी सर्व पक्षाकडून काळजी घेतली जात आहे. पक्षातले आणि अपक्ष आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था राजकीय पक्ष करत आहे. राज्यसभा निवडणुकीत होणारा घोडेबाजार पाहता पक्षांकडून ही दक्षता घेतली जात आहे. खास करून अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदारांची मत इतरत्र जाऊ नये यासाठी राजकीय पक्षाचा हा आटापिटा सुरू असल्याचे मत राजकीय विश्लेषकांचे आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी दहा जूनला मतदान होणार आहे. भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असून, या निवडणुकीमध्ये कोणतीही चूक व्हायला नको यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांकडून तयारी सुरू झाली आहे. स्वपक्षीय आमदारांच्या मतदानासोबतच भाजप आणि महाविकास आघाडीला अपक्ष आणि सहकारी पक्षाच्या आमदारांची मत आपल्या बाजूने करावी लागणार आहेत. यासाठीच हा खटाटोप दोन्ही बाजूने सुरू झाला आहे.
राज्यसभेच्या सहा जागा महाराष्ट्रातून आहेत. सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेने आपली दावेदारी सांगितली असून, दोन्ही पक्षाकडून आपले उमेदवार सहाव्या जागेसाठी घोषित करून निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक अपक्ष आणि स्वपक्षीय आमदारांचे मताचे महत्व लक्षात घेता, महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपल्या आमदारांना मतदानाआधी हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
आमदारांची व्यवस्था हॉटेलमध्ये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे आणि सहकारी अपक्ष आमदारांची बैठक आज वर्षा निवासस्थानी बोलावली आहे. मात्र, या बैठकीत बोलावण्यात आलेल्या आमदारांची थेट सोय मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे. राज्यसभा निवडणूक पार पडेपर्यंत या आमदारांना त्या हॉटेलमध्ये ठेवून मतदानासंबंधी महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून एकही मत बाद होऊ नये. यासोबतच सध्या सातत्याने शिवसेनेकडून या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होण्याचा आरोप केला जात आहे. या घोडेबाजारात अपक्ष आमदारांचे मत विरोधी गोटात फिरू नये याची दक्षता यामधून घेतली जात आहे. त्या अनुषंगाने विरोधी पक्षाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येक आमदाराशी स्वतः संपर्कात राहणार आहेत. खास करून अपक्ष आणि छोटा पक्षाच्या आमदारांसोबत गाठीभेटी घेऊन राज्यसभेला आपल्या उमेदवारांच्या बाजूने मतदान व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - Rajyasabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांच्या निधी वाटपाचा प्रश्न गाजणार?
कोणत्याही परिस्थितीत आमदारांचे मतदान व्हावे यासाठीचा आटापिटा - होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांना आपली मतपत्रिका दाखवावी लागत नाही. त्यामुळे तो अपक्ष आमदार आपल्या पक्षासोबत राहावा. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला त्याने मतदान करावे यासाठी राजकीय पक्ष हॉटेल मॅनेजमेंट करत आहे. मात्र यासोबतच काहीवेळा पक्षाबाबत किंवा उमेदवाराबाबत असलेली आमदारांची नाराजी मतदानात दिसू नये याचीही काळजी राज्य पक्षाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे केवळ सहावा उमेदवार हाच धोक्यात नसून इतर उमेदवारही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसने देखील राज्याच्या बाहेरचा उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दिला आहे. याबाबत उघडपणे काँग्रेसचे आमदार बोलत नसले तरी, त्याबाबतची नाराजी नक्कीच त्यांच्या मनात आहे. त्यामुळे एन मतदानाच्या वेळी आमदारांनी आजारपणाचे किंवा इतर कोणतेही महत्वाचं कारण देऊन मतदानापासून दूर राहू नये यासाठी आमदारांना दोन ते तीन दिवस आधी मुंबईत आणून हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून काँग्रेसच्या उमेदवाराला नाराजीचा फटका बसू नये. असं झाल्यास काँग्रेसचा उमेदवारही निवडणुकीत पराभूत होऊ शकतो. ही काळजी राजकीय पक्षाकडून घेण्यात येत असून त्यासाठी हॉटेलमध्ये आमदारांची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षालाही याचा फटका बसू शकतो याची कल्पना असल्यामुळे आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची योजना या पक्षांकडून करण्यात आली असल्याचे मत राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केल आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार तुरुंगात आहे. त्यांना मतदान करण्याचा हक्क बजावता येईल का याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळेच प्रत्येक मताचा महत्त्व लक्षात घेता महाविकासआघाडी असेल किंवा मग भाजप असेल दोन्ही पक्षांकडून सतर्कता बाळगली जात असल्याचं मत विवेक भावसार व्यक्त करतात.
काँग्रेसचे सर्व आमदार उद्या मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करताना खास प्रक्रियेतून हे मतदान होत असते. पहिल्या पसंतीची आणि दुसऱ्या पसंतीची मते महत्त्वाची असून हे मतदान करताना कोणती सावधगिरी बाळगावी याचं प्रशिक्षण आमदारांना देणे गरजेचे आहे. सावळ्या उमेदवाराच्या विजयात दुसऱ्या पसंतीच्या मतांना अधिक महत्त्व असणार आहे. त्यामुळे मतदान करताना कोणती सावधगिरी बाळगावी. जेणेकरून मतदान वाद न होता आपल्या उमेदवाराच्या पारड्यात जाईल याबाबत आमदारांना माहिती दिली जाणार आहे. यामुळे काँग्रेसच्या आमदारांनाही 7 जूनला मुंबईत येण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. एकूणच महा विकास आघाडीचा चौथा उमेदवार निवडून यावा यासाठी सहकारी पक्षाकडून दक्षता घेतली जात आहे. सात तारखेला मुंबईत दाखल झालेल्या सर्व काँग्रेस आमदारांची देखील पंचतारांकित हॉटेलमध्येच व्यवस्था केली जाणार असून त्यांनाही मतदानाबाबतचे बारकावे या ठिकाणी सांगितले जाणार आहेत.
भाजपही करणार हॉटेल मॅनेजमेंट - 8 जूनला भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि त्यांच्या सोबत असलेले सहकारी पक्षाच्या आमदारांनाही मुंबईत बोलावले असल्याचे माहिती सध्या समोर येतात. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये या सर्व आमदारांना ठेवण्यात येणार असून भारतीय जनता पक्षाच्या सोबत असलेल्या अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या गळाला लागू नये याची दक्षता भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात येत आहे. मात्र ही दक्षता भारतीय जनता पक्षाकडून घेत असतानाच शिवसेनेकडून आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याने आपल्या आमदारांवर शिवसेनेला भरवसा नाही का? असा चिमटा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी काढला आहे. तसेच या निवडणुकीसाठी रणनीती भारतीय जनता पक्षाकडून ठरवली गेली असून याबाबतची महत्त्वाची बैठक रविवारी पाच जून रोजी पार पडली. महाराष्ट्राचे प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून, कोरोना झाल्यामुळे या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड हे उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा तिसरा खासदार निवडून यावा यासाठी भाजपकडून सर्व दक्षता पाळल्या जात आहेत.
महाविकास आघाडीला पाठिंबा असणारे छोटे पक्ष किंवा अपक्ष आमदार- बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पक्ष 2, प्रहार जनशक्ती पक्ष 2, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1, शेकाप 1, क्रांतीकारी शेतकरी पक्ष 1, कम्युनिस्ट पक्ष 1 आणि 8 अपक्ष आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत. महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार आहेत. तर भाजपबरोबर जनसुराज्य पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1 आणि 5 अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडे 113 आमदार आहेत.
हेही वाचा - Shivsena Teaser : सत्ता असो वा नसो, आमचं हिंदुत्व तकलादू नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा हल्लाबोल