मुंबई - कोरोना काळात जीवाची बाजी लावणाऱ्या राज्यातील आशा सेविकांना मार्च अखेरीस थकीत देयके देण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope Statement On Aasha Sevika ) यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी आशा सेविकांच्या थकीत वेतनाचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यावर उत्तर दिले.
काय म्हणाले राजेश टोपे - सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशा सेविकांना राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्य स्तरावर पहिले पारितोषिक एक लाख, द्वितीय ७५ हजार तर तृतीय पारितोषिक ५० हजार रुपयांचे असेल. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर पहिले पारितोषिक ५० हजार, तर द्वितीय पारितोषिक तीस हजार रुपयांचे असणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. तसेच जुलै महिन्यापासून त्यांच्या मानधनात ५०० रुपये वाढ केली जाईल. राज्याचा १८० कोटी रूपयांचा हिस्सा देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
'शाळांच्या आवारात सीसीटीव्हीचा वॉच' - राज्यातील शाळा शाळेच्या आवारात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. यावर निर्बंध घालण्यासाठी शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. त्यात हार्डडिस्क असणे अनिवार्य असेल, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे दिली. राज्यात शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही लावण्याचा धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार राज्यभरात 65 हजार सरकारी शाळांमध्ये 1624 सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. उर्वरित शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही लावण्याची कारवाई केली जाईल, असे मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.
'शिक्षण आयुक्तांकडे या समितीची जबाबदारी' - राज्यातील शाळांमध्ये मुलींकरिता सुरक्षितेसाठी सखी सावित्री समिती गठीत केली जाईल. येत्या पंधरा दिवसात ही समिती गठीत करण्याच्या सूचना संबंधित शाळांना दिल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले. शाळांमधील वातावरण निकोप ठेवण्यासाठी ही समिती काम करेल. एका महिला शिक्षकावर मुलांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवली जाईल. तसेच शाळेत काही आक्षेपार्ह आढळल्यास ही समिती याची चौकशी करेल. शिक्षण आयुक्तांकडे या समितीची जबाबदारी असणार आहे. तसेच शाळांमध्ये पोलीस काका, पोलीस दीदीसह सर्व समितीच्या सदस्यांची नावे व क्रमांक शाळेच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत, असे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.