अमरावती - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मशिदीवरील भोंगे ( Mosque Loudspeaker Contraversy ) खाली उतरण्याची भाषा केली जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( RPI ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( Maharashtra Navnirman Sena ) या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवित विरोधही करणार आहे. राज्यातील सर्व मशिदीवरील भोंग्यांचे संरक्षण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भीमसैनिक करणार, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई ( Rajendra Gawai ) यांनी म्हटले आहे. भोंगा प्रकरणावरून सामाजिक शांततेत बाधा आणू नये, असे आवाहन देखील डॉ. राजेंद्र गवई यांनी 'ईटीवी भारत'शी बोलताना केले आहे.
'तेढ निर्माण करणारी महाराष्ट्राची परंपरा नाही' - समाजात तेढ निर्माण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतरणचा विषय असो किंवा इतर कुठल्याही गंभीर विषयांवर सर्वच पक्षांचे नेते एकत्रित आलेत आणि त्यांनी तोडगा काढला आहे. विरोधकांचाही मान राखणे अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. आता राज ठाकरे यांनी जी काही भूमिका घेतली आहे ती अतिशय चुकीची असून 25 एप्रिल रोजी मुंबईत गृह विभागाच्यावतीने झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने घेण्यात आलेली भूमिका मागे घ्यावी अशी विनंती केली होती. त्या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, आदित्य ठाकरे इत्यादी नेते उपस्थित होते, असे डॉ. राजेंद्र गवई म्हणाले.
'प्रत्येकाने राखावा सर्व धर्मांचा आदर' - सर्व धर्म समभाव हीच आपल्या देशाची ओळख असून संविधानाने प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याची मुभा दिली आहे. हनुमान चालीसा असो किंवा अजान असो ही आपली परंपरा असून अशा परंपरेच्या विरोधात समाजात कटुता निर्माण करणे योग्य नाही. महाराष्ट्रातील जनतेने समाजात तेढ निर्माण होईल अशा कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिथावणीखोर आव्हानाला बळी पडू नये. या अशा प्रकारातून समाजातील गरीब सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते असे देखील डॉ. राजेंद्र गवई म्हणाले.