मुंबई - राज्य सरकार 300 गडकिल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल उभारणार आहे. याला गडकिल्ले संवर्धन समितीने विरोध दर्शवला असून याचे नेतृत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करावे यासाठी आज समितीने कृष्णकुंज येथे राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या 10 वर्षांपासून व्यसनमुक्त गडकिल्ले अभियानच्या माध्यमातून किल्ले संवर्धन व किल्ले प्लास्टिक मुक्त करत आहोत. चित्र, व्यंगचित्र, पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत. पाच वर्षांपूर्वी व्यसनमुक्त शिवकिल्ले कायद्याचा मसुदा बनवून हा कायदा व्हावा म्हणून 150हून अधिक आमदारांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रातील 300 किल्ले (माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 354 किल्ले आहेत) हेरिटेज हॉटेलसाठी देऊ केले आहेत. याचा गडकिल्ले संवर्धन समिती विरोध नोंदवत असल्याचे जाणता प्रतिष्ठानचे प्रभाकर ताम्हणकर यांनी सांगितले.
हेही वाचा- मुंबईत पावसाची विश्रांती; बाप्पांचे विसर्जन उत्साहात पार पडणार...