मुंबई - एसटी कर्मचार्यांच्या संपाचा आज सहावा दिवस असून अद्यापही संपावर तोडगा निघालेला नाही. संपावर तोडगा निघावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत लवकरात लवकर राज्य सरकारने तोडगा काढावा याबाबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांची भेट घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावर शरद पवार यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत लवकर तोडगा काढावा अशी विनंती राज ठाकरेंनी शरद पवारांना केल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
कर्मचार्यांच्या संपाला मनसेकडून पाठिंबा आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या विरोधात जाणार नाही. लवकरात लवकर तोडगा निघेल असा विश्वासही बाळा नांदगावकर यांनी बोलून दाखवला. विलीनीकरणाचा निर्णय लगेच राज्य सरकारला घेता येत नसला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढावा यासाठी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे त्यांना पगार देण्यात यावा असा मार्ग राज ठाकरेंनी शरद पवार यांना सांगितले.
जाणून कोणत्या कारणासाठी आहे हा संप
एसटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. संपामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावे. राजकीय पक्षांनी या संपात उडी घेतल्याने संप चिघळला आहे. विलीनीकरणाची जे मागणी रेटत आहेत, त्यांनी त्यांच्या काळात एसटीचे विलीनीकरण का केले नाही असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला होता. राज्याची आणि एसटीची आर्थिक त्यावेळी परिस्थिती चांगली होती. परिवहन विभाग आर्थिक डबघाईला आल्याने दोन दिवसांत विलीनीकरण शक्य नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाचा पेच: काँग्रेस-राष्ट्रवादी नागपूरसाठी, तर शिवसेना मुंबईत घेण्यासाठी आग्रही!