मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंगा यांच्या विरोधात आंदोलन छेडून महाराष्ट्रात खळबळ माजवून दिली होती. त्या पाठोपाठ राज ठाकरे यांनी हिंदू जननायक अशी स्वतःची प्रतिमा तयार करीत हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी अयोध्या वारी करण्याचा मनोदय जाहीर केला. मात्र राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीय विरोधातील भूमिकेचा अडसर त्यांच्या अयोध्या दौऱ्यापुढे आला. ज्या भाजपाच्या अजेंड्यानुसार राज ठाकरे चालतात असा आरोप केला जातो त्याच भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिज भूषण सिंग यांनी राज ठाकरे यांना आयोध्येत येण्यास मज्जाव केला. राज ठाकरे यांच्या विरोधात सातत्याने धमकी देत प्रचंड जनसमुदाय गोळा करण्याचा त्यांनी इशारा दिला. राज ठाकरे आणि मनसे नेते मात्र ब्रिजभूषण सिंह यांच्या या भूमिकेबाबत चकार शब्द उच्चारायला तयार नव्हते. अशी माहिती ज्येष्ठ राजकीय विवेक भावसार यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांचा दौरा स्थगित ( Raj Thackeray visit to Ayodhya canceled )
अखेरीस राज ठाकरे यांनी आपला 5 जून रोजी असलेला अयोध्या दौरा स्थगित केला. यासाठी त्यांनी आपल्या पायाच्या दुखण्याचे कारण पुढे केले. विशेष म्हणजे पाय दुखतो आहे, असे सांगणारे राज ठाकरे त्याच क्षणी पुण्यासाठी रवाना होते आणि ते पुण्यात सभाही घेणार आहेत. त्यामुळे पाय दुखण्याचे त्यांचे कारण हे अत्यंत तकलादू आहे हे स्पष्ट झाले. ब्रिज भूषण सिंह यांच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील अयोध्या वारीला झालेल्या विरोध आणि त्यातून उद्भवणारी परिस्थिती हेच यामागचे मुख्य कारण आहे, असे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी मत व्यक्त केले आहे.
दुसऱ्याच्या अजेंड्यावर चालल्यामुळे अडचण - राज ठाकरे हे प्रत्येक मुद्दा अथवा आंदोलन जाहीर केल्यानंतर आरंभ शूरता दाखवतात आणि नंतर ते आंदोलन अथवा मुद्दा सोडून देतात. ही त्यांची आजवरची ख्याती आहे. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी सुद्धा मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले मात्र आता ते आंदोलन शांत झाले आहे. अयोध्या दौऱ्याच्या बाबतीतही त्यांच्याकडून याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. पण यावेळेस आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, भाजपाने ज्ञानवापी मुद्दा असून त्याच मुद्द्यावर भाजपाला राजकारण करायचे आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जर अयोध्या मुद्द्यावरच अडून राहिले तर ज्ञानवापीच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे म्हणून भाजपाने तूर्तास तरी राज ठाकरे यांना शांत राहण्याचा किंवा एक पाऊल मागे घेण्याचा सल्ला दिला असण्याची शक्यता आहे कारण सध्या तरी ज्ञानवापी वरून जनतेचे लक्ष अन्य ठिकाणी वळवण्यास भाजपा उत्सुक नाही, अशी प्रतिक्रिया आहे भावसार यांनी दिली आहे.
ज्ञानवापी हाच खरा अयोध्या दौऱ्यातला मुद्दा
मोठे पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष लहान पक्षांना स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असतात वास्तविक यावेळेस लहान पक्षांचा सुद्धा त्यामध्ये स्वार्थ दडलेला असतो त्यामुळे लहानपण या मोठ्या पक्षांच्या इशाऱ्यावर चालताना दिसतात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सध्यातरी भाजपा शिवाय पर्याय नाही त्यामुळे मनसे भाजपाच्या इशाऱ्यावर चालताना दिसते आहे. भाजपाच्या इशाऱ्यावरूनच राज ठाकरे आणि हिंदुत्व आणि हनुमान चालीसा चा मुद्दा उपस्थित केला तसेच अयोध्या वारी जाहीर करण्यात आली. मात्र राज यांच्या अयोध्या वारीला ब्रीजभूषण सिंग यांनी अचानक विरुद्ध दर्शवल्याने नवा मुद्दा उपस्थित राहिला वास्तविक ब्रिजभूषण यांना भाजपा शांत करू शकते आणि अयोध्या द्वारे बिन दिक्कत होऊ शकते. परंतु सध्या भाजपाने छेडलेला ज्ञानवापीचा मुद्दा त्यांना सर्व दूर पसरवायचा आहे म्हणूनच या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी भाजपाने राज ठाकरे यांना सबुरीचा सल्ला दिला असावा अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केली आहे.