मुंबई - आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत - जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही ! असे खरमरीत पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackerya ) यांना लिहिले आहे. राज ठाकरे यांनी हे पत्र ट्विट केले आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी 4 मे पासून भोंगे उतरवा आंदोलन सुरु केले आहे. त्यापूर्वीच मनसैनिकांची धरपकड, तडीपारी आणि प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्या, अनेकांना तुरुंगातही डांबण्यात आले. महाराष्ट्र सैनिकांची ही दडपणूक कोणाच्या सांगण्यावरुन होत आहे. हे महाराष्ट्र पाहात आहे. राज्य सरकारला आमचे एकच सांगणे आहे, आमच्या सहनशीलतेचा अंतर पाहू नका. असे पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
काय आहे पत्रात - मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात, सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. 4 मे रोजी 'भोंगे उतरवा' आंदोलन सुरु करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनीप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी! असा सवाल मनसे प्रमुखांनी ट्विट केलेल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना केला आहे.
राज ठाकरे लिहितात, गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी 'धरपकड मोहीम' राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातील 'रझाकार' आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. असे म्हणत राज ठाकरे यांनी टोला लगावला.
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही ! असा इशारा या पत्रातून राज ठाकरे यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला आणि त्यानंतर ठाणे व औरंगाबादमधील सभेत मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याचा आवाहन केले होते. अन्यथा मशिदींसमोर त्याच्या दुप्पट स्पिकर लावून हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा दिला होता. मशिदींवर लावलेल्या लाऊडस्पीकर उतरवण्यासाठीच्या या आंदोलनावरुन मनसे कार्यकर्ते आणि राज्यातील पोलिस आमने-सामने आले होते. मनसेचे नेते संदिप देशपांडे यांना राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी पकडले होते, मात्र ते पोलिसांना चकमा देऊन फरार झाले. अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. काहींना अटक तर काहींना तडीपार केले. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणावरुन त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.