मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणात गहना वशिष्ठ ही अभिनेत्री आरोपांच्या फेऱ्यात आहे. गहना वशिष्ठला मुंबई सेशन कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. अटकेच्या भितीमुळे गहना वशिष्ठने अंतरिम जामीन मिळावा म्हणून कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने या प्रकरणात गहनाला कोणताही दिलासा दिला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार आहे.
हेही वाचा - राज कुंद्राचा पाय आणखी खोलात, 3 निर्मात्यांसह गहनाच्या विरोधात तक्रार दाखल
काय आहे प्रकरण?
या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात एका मॉडेलने आरोप केले होते. या आरोपात जबरदस्तीने अश्लील सिनेमांमध्ये काम करायला लावणे, धमकवणे असे आरोप लावण्यात आले होते. यानंतर गहना वशिष्ठला अटक करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने गहनाला जामीन दिला होता. आता या प्रकरणात राज कुंद्रा याचे नाव समोर आले आहे. राज कुंद्राच्या हॉटशॉट्स आणि बॉलिफेम या अॅपसाठी गहना अश्लील व्हिडिओ बनवत होती.
क्राइम ब्रांचकडून करण्यात आली अटक
अभिनेत्री गहना वशिष्ठला मुंबईच्या मढ आयलँडमध्ये क्राइम ब्रँचने बंगल्यावर छापा टाकून अटक केली होती. तिच्यावर अश्लील रॅकेटमध्ये गुंतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गहना सुरुवातीपासूनच राज कुंद्राला पाठिंबा देत आली आहे. क्राइम ब्रँचने पुन्हा समन्स बजावल्यानंतर गहनाने सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून वारंवार होत असलेल्या चौकशीच्या फेऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा - उमेश कामतने दिली होती 'ही' ऑफर; पॉर्न प्रकरणी मॉडेलचा खळबळजनक खुलासा
तपासादरम्यान गहनाचे नाव
उद्योगपती राज कुंद्राच्या कंपनीच्या तीन-चार निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अभिनेत्री गहना वशिष्ट हिचेदेखील नाव आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपासादरम्यान, आता आरोपींमध्ये गहनाचे नाव समोर आले आहे.
गहनाकडून कुंद्राची पाठराखण
राज कुंद्रा अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अडकल्यापासून गहना नेहमी त्याची पाठराखण करीत असते. कुंद्रा हा पॉर्न फिल्म बनवीत नव्हता, तर इरॉटिक सिनेमा बनावायचा असा युक्तीवाद केला जात आहे. गहनादेखील हेच सांगत आहे.