मुंबई - सलग ४८ तास कोसळलेल्या धुव्वाधार पावसामुळे मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाला आज ( सोमवारी) सुट्टी देण्यात आली आहे. परंतु रात्री पावसाने उघडीप दिली असून मुंबई शहरातील पाणी ओसरुन जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
सोमवारी सकाळी रस्ते आणि रेल्वे वाहतुक सुरळीत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळं हवामान विभाग आणि सरकारचा इशारा फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिवृष्टीच्या काळात रविवारपासून ठाणे-पालघर जिल्ह्यातील आपत्कालीन कक्षांसह नौदल आणि एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
२४ तासात २०४ मिलीमीटर पाऊस -
मुंबापुरीला झोडपून काढत रविवारी जनजीवन ठप्प करणाऱ्या पावसाची, मागील २४ तासात तब्बल २०४ मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी ४०० मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे.
कोसळधारेदरम्यान ठिकठिकाणी पडझडही झाली. तर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. या पाण्याचा मनपाच्या पंपाने तर काही ठिकाणी नैसर्गिकपणे निचरा झाला आहे.
पुढचे 24 तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तर पुढच्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरचा पाऊस हळूहळू कमी होईल, अशी शक्यता देखील त्यांना व्यक्त केली आहे.