मुंबई - सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय रेल्वे प्रवास सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर रेल्वे विभागाकडून सकारात्मकता दर्शवण्यात आली आहे. यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिक माहिती मागितली आहे. आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली.
१ नोव्हेंबरपासून मुंबईतील सर्व उपनगरीय गाड्या सुरू करण्यासाठी प्रवाशांकडूनही विभागावर दबाव आहे. रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भातील अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकारशी आम्ही अधिक चर्चा करत आहोत, असे पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते सुमित ठाकूर आणि मध्य रेल्वेचे प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी सांगितले.
उपनगरीय गाड्या सुरू झाल्यास अनेकांच्या प्रवासाचा प्रश्न सुटणार
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने महिलांना दिलासा देत उपनगरीय प्रवासाची मुभा दिली. तर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अद्यापही रेल्वेचे दरवाजे बंदच आहेत. अशावेळी सर्वांना प्रवासाची मुभा केव्हा मिळणार, असा प्रश्न सातत्याने सर्वसामान्य मुंबईकर विचारत होते. तर व्यावसायिक, कर्मचारी आणि सर्वसामान्यांना प्रवास करण्याची परवानगी कधी मिळणार हा प्रश्न होता. उपनगरीय गाड्या सुरू झाल्यास अनेकांच्या प्रवासाचा प्रश्न सुटणार आहे.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून मुंबईची लाइफलाइन समजली जणारी उपनगरीय रेल्वे सेवा ठप्प आहे. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच अलिकडे महिलांना देखील प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, सर्वांना लोकल प्रवास करू द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.
दररोज 85 लाख प्रवासी करतात प्रवास
मुंबईत दररोज सरासरी सुमारे 85 लाख प्रवासी 3200 रेल्वे गाड्यांची सेवा वापरतात. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) 157 स्थानकांद्वारे 390 किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. यातून मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवाल्यांसह दररोज कार्यालयात जाण्या-येण्यासाठी कर्मचारी प्रवास करतात.