मुंबई - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा मुंबई दौरा निश्चित झाला ( Rahul Gandhi Will Come in Mumbai ) आहे. सध्या त्यांच्या दौऱ्याची तारीख ठरली नसली तरी, एप्रिल महिन्याच्या अखेरीस राहुल गांधी मुंबईत येतील, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, उत्साह सोबतच काँग्रेस नेत्यांनी या दौऱ्याबाबत भीतीही आहे. मुंबईच्या दौऱ्यात राहुल गांधी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच दोन वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांकडून सरकारच्या कामाचा आढावाही घेतला जाणार आहे. त्यातच काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात भीतीचे वातावरण या दौऱ्यामुळे आलेले पाहायला मिळत आहे.
काँग्रेसमध्ये मंत्री बदलाचे वारे - महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस मंत्र्यांमध्ये बदल केले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. राहुल गांधी यांच्या दौरा त्या बदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. बंदरे विकास आणि मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, क्रीडामंत्री सुनील केदार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह काही खात्याचे मंत्री बदलले जाण्याची शक्यता काँग्रेसच्या गोटात वर्तवली जात आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांच्या दौऱ्यात काँग्रेस मंत्र्यांच्या रिपोर्टकार्ड चांगला नसल्यास त्या मंत्र्याला डच्चू मिळण्याची शक्यता असल्याने तर राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत काँग्रेस गोटामध्ये भीतीचे वातावरण आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी, मंत्रिपदाची सुप्त इच्छा नाना पटोले यांची आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून नाना पटोले यांना ओळख आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या दौऱ्यात नाना पटोले यांच्या मंत्रीपदावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र, तो शिक्कामोर्तब होत असताना कोणत्या मंत्र्यांचा पदभार काढला जाईल, याचीही भीती काँग्रेसमध्ये आहे.
काँग्रेस नेत्यांची आढावा बैठक - राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याआधी काँग्रेस मंत्र्यांनी 19 एप्रिलला सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेस आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे काँग्रेस मंत्र्यांबाबत व्यक्त केलेल्या नाराजीचीही चर्चा झाली. काँग्रेस आमदार महाविकास आघाडी सरकारमध्ये इतर दोन पक्षांकडून सहकार्य केले जात नसल्याची नाराजी काँग्रेस आमदारांमध्ये आहे. याबाबतही काँग्रेस मंत्र्यांना राहुल गांधी समोर उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळेच आढावा बैठकीत काँग्रेस आमदारांच्या नाराजी दूर करण्याबाबत मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. काँग्रेस आमदारांच्या कामांना प्राधान्य दिले जावे, यासाठी काँग्रेस मंत्र्यांनी आता आग्रह धरला. काँग्रेस आमदारांच्या नाराजीमुळे राहुल गांधीच्या नाराजीला काँग्रेस मंत्र्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
जनतेसोबत संपर्क वाढवण्याची काँग्रेसची धडपड - गेल्या दोन महिन्यापासूनच काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. तरुणांना काँग्रेसची जोडण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या अभियानावर महाराष्ट्रात प्रभावशाली काम झालेले नाही. याबाबतची नाराजी दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. या नाराजीने काँग्रेस नेत्यांनी या अभियानात झपाट्याने काम सुरू केल आहे. काँग्रेसने सुरू केलेल्या या अभियानाबाबत देखील राहुल गांधी या दौऱ्यातून आढावा घेतील. त्यामुळेच काँग्रेस मंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सर्व काँग्रेसच्या पालकमंत्र्यांना आणि संपर्कमंत्री जिल्ह्यात संपर्क वाढविण्याबाबत च्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राहुल गांधींचा बहुउद्देशीय दौरा असणार - राहुल गांधी यांचा काही महिने आधीच मुंबई दौरा होणार होता. या दौर्यात बीकेसीमध्ये राहुल गांधी यांची सभा घेण्याचाही निश्चय काँग्रेसने केला होता. मात्र, कोरेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हा दौरा रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौर्यातून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी प्रयत्न राहुल गांधी करतील, असे मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यावेळी पक्षांतर्गत नाराजीवर चर्चा तर होईल. या सोबतच गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही महाराष्ट्रातून नेमकी काय तयारी केली जाऊ शकते याबाबतही आढावा या दौऱ्यातून राहुल गांधी घेतील, असे मत विजय चोरमारे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - Stock Market Today : शेअर बाजाराची सकारात्मक सुरवात सेनेक्स 250 अंकाने वाढला निफ्टी पुन्हा 17 हजारावर