मुंबई-राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षाचे ४५ सदस्य असताना ते ५-७ व्यक्तीचे काम एकटेच करत असत. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कमपणे उभे राहील, अशा शोकभावना खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्व. खा. राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाइन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते, यावेळी राहुल गांधी बोलत होते.
आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, राजीव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत शांत स्वभावाचा, पक्षाशी निष्ठा असणारा, कामाच्या जोरावर पक्षावर विविध भूषवणारे, पक्ष कार्याला प्रथम महत्व देणारे राजीव यांचे एवढ्या कमी वयात निधन होईल असे वाटले नव्हते. ते एक लढवय्या नेता होते. पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले. राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे. सातव कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना.
![Rahul Gandhi , Priyanka Gandhi , online condolence meeting for MP rajiv satav , MP rajiv satav death , राजीव सातव निधन , ऑनलाइन श्रद्धांजली सभा , राहुल गांधी , प्रियंका गांधी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_19052021234656_1905f_1621448216_516.jpg)
मल्लीकार्जून खर्गे म्हणाले की, कोरोनाने आमचा एक युवा साथीदार आम्हाला सोडून गेला हे मनाला पटत नाही. पक्षासाठी सदैव तत्पर असणारा, पक्षनेतृत्वाचा विश्वास, काम करण्याची क्षमता असलेला, काँग्रेस पक्षातील पुढच्या पिढीतील भवितव्य होते. ते वंचितांचा आवाज, तरुणांचे प्रेरणास्रोत होते. कमी वयातच त्यांनी कारकिर्दिला सुरुवात करुन आपल्या कामाच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर पोहचले. संसदेत ते सामान्य जनतेसाठी आवाज उठवत असत. फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती.
![Rahul Gandhi , Priyanka Gandhi , online condolence meeting for MP rajiv satav , MP rajiv satav death , राजीव सातव निधन , ऑनलाइन श्रद्धांजली सभा , राहुल गांधी , प्रियंका गांधी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_19052021234656_1905f_1621448216_126.jpg)
गुलाम नबी आझाद म्हणाले की, राजीव सातव यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला. राजीव लहान असल्यापासून आपण त्यांना ओळखत होतो. त्यांच्या कुटुंबीयांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने सातव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या निधनाने पक्षाचा तसेच कुटुंबाचा मोठा आधार गेला आहे.
एच. के. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील एक उमदे नेतृत्व ज्यांनी महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर उत्तम काम केले. पक्षाने त्यांना दिलेली जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. देशासाठी आणि पक्षासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. काँग्रेस विचारांशी त्यांची बांधीलकी होती. जनसामान्यांमध्ये ते लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधानाने माझे वैयक्तीक व पक्षाची मोठी हानी झाली आहे. राजीव हे त्यांच्या कामाच्या माध्यमातून सदैव स्मरणात राहतील.
के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, राजीव यांनी ग्रामीण भागातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करुन देशपातळीवर आपल्या कामाचा वेगळी छाप पाडली होती. संसदेत काँग्रेस पक्षाची रणनीती ठरवण्यातही ते नेहमी आग्रही असत. गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांनी पक्षाला मोठी ताकद मिळवून दिली. काँग्रेस पक्षाची गुजरातमध्ये वाढलेली ताकद ही राजीव सातव यांच्या कामाचा परिपाक आहे. कोरोनाने राजीव सातव यांना आपल्यातून हिरावले ही अत्यंत दुःखद घटना आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राजीव सातव हे उमदे नेतृत्व तसेच पक्षाचे भविष्य होते. कोरोनाने त्यांना अकाली हिरावून घेतले. शेतकरी, कामगारांसाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती. लोकसभेत त्यांच्याबरोबर काम केले. राजीव यांच्या निधनाने पक्षाची व वैयक्तीक मोठी हानी झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, राजीव सातव यांच्याबरोबर संसदेत एकत्र काम केले. पाच वर्ष त्यांनी संसदेत उत्तम काम केले. ते अभ्यासपूर्ण विषय मांडायचे, स्वतःच्या मेहनतीच्या बळावर ते देशपातळीवर पोहचले. राजीव यांचे निधन हा एक मोठा धक्का असून पक्ष व सातव कुटुंबासाठी ही मोठी हानी आहे.
सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, राहुल आणि सोनिया गांधी यांनी राजीव सातव यांच्यावर नेहमीच मोठ्या विश्वासाने जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती जबाबदारी उत्तमरितीने पार पाडून नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवला. वंचित, मागास समाजाचे प्रश्न ते मोठ्या हिरीरीने मांडत असत. त्यांच्या निधनाने आपण एक तरुण नेतृत्व गमावले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कमी वयात राजव सातव यांनी महाराष्ट्र व देशाची सेवा केली. विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रीय सरचिटणीस पदाच्या माध्यमातून पक्षाचे काम उत्तम पद्धतीने पार पाडले. राष्ट्रीय पातळीवर काम करत असतानाही स्वतःच्या मतदारसंघातील विकास कामासाठी ते सतत झटत होते. ते एक तरुण झुंजार नेते होते. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला चांगले यश मिळवून दिले. त्यांच्याकडून पक्षाला मोठ्या अपेक्षा होत्या.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजीव सातव एक अभ्यासू तरुण नेतृत्व होते, राज्यसभा, लोकसभेचे सदस्य नात्याने त्यांनी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सभापती पदावर काम केले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी पक्षात तरुणांचे मोठे संघटन उभे केले.
मुकुल वासनिक म्हणाले की, राजीव सातव यांच्या कामात परिपक्वता होती. त्यांनी तरुण वयातच पक्षासाठी मोलाचे काम केले. त्यांच्या निधनाने काँग्रेसने एक मोठा नेता गमावला.माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले की, दूरदृष्टी, संतुलित विचार करण्याची क्षमता असलेला अभ्यासू नेता राजीव सातव तरुण वयात निघून गेला. त्यांना पक्षात उत्तम भवितव्य होते.
ऑनलाइन श्रद्धांजली सभेत खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी, विरोधी पक्षनेते राज्यसभा मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस मुकुल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेता तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, दूग्धविकास मंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष मोहन जोशी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आ. अभिजित वंजारी तसेच काँग्रेसचे खासदार, आमदार आदी सहभागी झाले होते.