मुंबई - काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपचा प्रचार करणार नाहीत. ते अजूनही आमचे नेते आहेत, पण काँग्रेस सोडून ते इतर पक्षाचा प्रचार करत असल्याच्या तक्रारी आल्यास त्यांना समज देऊ, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील भाजपकडून अहमदनगरची लोकसभा निवडणूक लढवत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांचा मुलाचा प्रचार करत असल्याचे चर्चिले जात आहे, अशी विचारणा चव्हाण यांना केल्यानंतर त्यांनी विखे-पाटलांवर विश्वास दाखवला. मात्र, कुणी काँग्रेसमध्ये राहून इतरांचा प्रचार करत असल्याच्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित राहिले नसल्याने, त्यांच्याविषयी प्रश्नांचा रोख राहिला होता. यावेळी चव्हाण यांना चांगलीच शाब्दिक कसरत करावी लागली. राधाकृष्ण विखे पाटील यांची येत्या निवडणुकीत चांगलीच कोंडी झाली आहे. तसेच विखे पाटील यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना आयते कोलीत मिळाल्याने पाटील यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. मात्र, त्यांची बाजू मांडता-मांडता अशोक चव्हाण यांनाही शाब्दिक छल करण्याची वेळ आली आहे.