मुंबई -भाजपचे खंडाळ्यातील नेते पुरुषोत्तम जाधव यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, उपनेते व कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील, आदी उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात जाधव रिंगणात उतरणार आहेत.
पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेतून प्रथम 2009 मध्ये उदयनराजे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांना 235068 मते मिळाली होती. 2014 मध्ये सातारा लोकसभेची जागा भाजपने रिपब्लिकन पक्ष्याला सोडली होती. त्यामुळे जाधव अपक्ष उभे राहिले होते. त्यांना उदयनराजेंच्या विरोधात 155937 मते मिळाली होती. आता 2019 साठी पुन्हा ते भाजपमधून शिवसेनेत आले असून तिसऱ्यांदा सातारा लोकसभा निवडणूक उदयनराजेंच्या विरोधात लढणार आहेत.
पूर्वी जाधव हे शिवसेनेत होते, पण 2014 च्या निवडणुकीत भाजपची सत्ता राज्यात आल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते भाजपमधून सातारा लोकसभा लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र त्यांना भाजपकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटणीला आला. त्यामुळे त्यांनी भाजप सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.